पाचगणी : सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगररांगांमध्ये वसलेल्या पर्यटननगरी पांचगणीने आज जागतिक क्रीडा विश्वात ऐतिहासिक पाऊल टाकले. पॅराग्लायडिंग विश्वचषक २०२६ चे भव्य उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार Nitin Patil यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, “पांचगणीची ओळख आतापर्यंत थंड हवामान व पर्यटन स्थळ म्हणून होती; मात्र या स्पर्धेमुळे ती आता जागतिक पातळीवरील ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून उदयास येईल.”
युरोपातील विविध देशांमध्ये प्रामुख्याने भरविण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच भारताला आणि त्यातही पांचगणीला मिळाल्याने सातारा जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक व अभिमानास्पद क्षण ठरला आहे. सह्याद्रीच्या उंच कड्यांवरून रंगीबेरंगी पॅराग्लायडर्स आकाशात झेपावताना पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळली होती.
या स्पर्धेत जगातील सुमारे २५ देशांतील २०० हून अधिक नामांकित आणि अनुभवी पॅराग्लायडर्स सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे तांत्रिक परीक्षण व नियोजन करण्यासाठी Paragliding World Cup Association चे अध्यक्ष श्री. गोरान यांच्यासह आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आणि तज्ज्ञ उपस्थित आहेत. स्पर्धेची पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय मानदंडांचे पालन यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेमुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पर्यटनवाढीस चालना मिळून जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जागतिक स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पांचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, दांडेघर गावच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने तसेच Paragliding World Cup Association च्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, श्री. दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी अनुपम जाधव पाटील यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व आभार मानले. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान रंगणाऱ्या या जागतिक स्पर्धेमुळे पांचगणी शहरात सध्या उत्सवाचे वातावरण असून, आकाशात झेपावणाऱ्या पॅराग्लायडर्समुळे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना रंगत आली आहे. पांचगणी आता जागतिक क्रीडा नकाशावर ठळकपणे झळकू लागल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.