दहिवडी : माण तालुक्यातील आंधळी येथे दुचाकीच्या अपघातात चैतन्य दादासाहेब चव्हाण (वय २६, रा. बोथे, ता. माण) आणि आकाश सुरेश लवंगारे (वय ३०, रा. राजापूर, ता. खटाव) हे दोघे जागीच ठार झाल्याची घटना आज घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चैतन्य व आकाश हे दुचाकीवरून राजापूर येथून नातेपुतेला निघाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते मलवडी येथून दहिवडीच्या दिशेने जाताना, आंधळी येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ चैतन्यचे दुचाकीवरील(एमएच ११ सीएफ ८२३९) नियंत्रण सुटले.
वेगातील मोटारसायकल रस्त्यालगत असलेल्या लिंबाच्या झाडाला धडकली. या भीषण अपघातात चैतन्य चव्हाण आणि आकाश लवंगारे हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका व पोलिसांशी संपर्क साधून जखमींना दवाखान्यात हलविले.
मात्र, उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातस्थळी पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली.