सातारा : सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष वाढीसाठी व निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर स्थानिक स्तरावर सूक्ष्म नियोजन केले तर नक्की यश मिळेल. त्यासाठी प्रत्येक कॉंग्रस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रयत्न करायला हवेत, असे अखिल भारतीय कॉंग्रेसचे निरीक्षक व गुजरातचे आमदार अमरीत ठाकूर यांनी सांगितले.
सातारा येथील कॉंग्रेस कमिटीत माढा लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निरीक्षक अमरित ठाकूर यांनी माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याचवेळी कार्यकर्त्यांनी माण मतदारसंघाची जोरदार मागणी केली. माण हा कॉंग्रेसचा मतदारसंघ आहे. येथे पक्षाची ताकद आहे. त्यामुळे माण मतदारसंघ कॉंग्रेसकडे घेऊन पहिल्या यादीत माणच्या उमेदवाराचे नाव जाहीर करावे, अशी मागणी झाली.
माण मतदारसंघातील पदाधिकारी आक्रमक आणि मुद्देसूदपणे मांडणी करत होते. माणमध्ये कॉंग्रेस आणि भाजपमध्येच लढाई आहे. कॉंग्रेसने अनेक निवडणुका लढवून जिंकल्या आहेत. तर कॉंग्रेसने यापूर्वीही माण, कराड दक्षिण आणि वाई मतदारसंघाची अनेकवेळा मागणी केलेली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, सरचिटणीस नरेश देसाई, रणजितसिंह देशमुख, बाबासाहेब कदम, संदीप चव्हाण, संदीप माने, प्रा. विश्वंभर बाबर, डॉ. महेश गुरव आदी उपस्थित होते.