सातारा : सातारा शहरातील कुंभारवाडा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई माता मंदिर परिसर, जिल्हा न्यायालयाच्या समोरील भाग यासह शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले असतात. शहरातील कचरा उचलण्यापेक्षा पालिकेच्या घंटागाड्या खासगी हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी प्राधान्य देतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत. सातारा शहर स्वच्छ, सुंदर ठेवायचे असेल तर पालिका प्रशासनाने शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी कटाक्षाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिल्या.
शहरातील हरीजन- गिरीजन परिसरातील सांड पाण्यामुळे केसरकर पेठ- कुंभारवाडा परिसरातील नागरीकांना वर्षानुवर्षे नाहक त्रास होत आहे. तसेच याठिकाणी सातत्याने पडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही अशा तक्रारी कुंभारवाडा येथील नागरिकांनी सौ. वेदांतिकाराजे यांच्याकडे केल्या. नागरिकांच्या मागणीनुसार सौ. वेदांतिकाराजे यांनी आज या परिसरात स्वतः जाऊन समस्यांची पाहणी केली आणि पालिका प्रशासनाची कानउघडणी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते, कविता देगांवकर, स्वप्नील माने, राजेंद्र कुंभार, कदम काकु, अरविंद राजे, मंदाकिनी कुंभार, रेखा कुंभार, शिवाजी कुंभार, गणेश कुंभार, कानेटकर, चारुदत्त देगांवकर, मयुर कुंभार, पवन कुंभार, वैभव कुंभार, अनिकेत कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
या भागातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नाल्याची रुंदी त्वरित वाढवण्याची सूचना सौ. वेदांतिकाराजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिलीप चिद्रे यांना केली. कचऱ्याची समस्या जटिल झाली असून याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. त्यामुळे पालिकेचे आरोग्य निरीक्षक राठोड यांना तात्काळ बोलावून घेऊन कचऱ्याचे ढीग दाखवण्यात आले. कामात कुचराई करणाऱ्या राठोड यांची कानउघडणी करून सौ. वेदांतिकाराजे यांनी कचरा उचलण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देण्याची सूचना केली. समस्यांची पाहणी करून जागेवर निपटारा केल्याबद्दल नागरिकांनी सौ. वेदांतिकाराजे यांचे आभार मानले.
कचरा टाकणारांवर होणार दंडात्मक कारवाई
दरम्यान, हरिजन गिरिजन सोसायटीतील कचरा कुंभारवाडा परिसरातील मोकळ्या जागेत फेकला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यांनतर या सोसायटीला नोटीस बजावण्याची निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. तसेच उघड्यावर कचरा टाकणारांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी बापट यांनी यावेळी स्पष्ट केले.