सातारा : सातारा जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे, बंधारे, तलाव व इतर जलस्रोतांवरील शेती पंपांची उपसा बंदी आणि वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवार, दि. २३ जून रोजी नागठाणे (ता. सातारा) येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी केली आहे.
उपसा बंदीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी, पशुपालक, दुग्ध व्यवसायिक, कुक्कुटपालक आणि भाजीपाला उत्पादक गंभीर अडचणीत सापडले असून उभी पिके, जनावरांचा चारा, फळबागा आणि भाजीपाला धोक्यात आला असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
यासंदर्भात १९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकरी प्रतिनिधींनी नदीपात्रातील उपलब्ध पाणी दूषित असल्याने ते पिण्यासाठी वापरले जात नसल्याचे सांगत, ते वाहून जाण्यापेक्षा दररोज किमान चार तास शेतीसाठी पाणी उपसा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. तसेच धरणातील पाणी पुढील दहा दिवस कोणत्याही परिस्थितीत सोडू नये, अशी भूमिकाही मांडण्यात आली होती.
शेतकरी प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचा निर्णय असल्याचे स्पष्ट करत शेतकऱ्यांचे निवेदन आणि पाटबंधारे विभागाचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा करत सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे आता संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत २३ जून रोजी सकाळी १० वाजता नागठाणे येथील ग्रामदैवत आई चौडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन शेतकरी एकत्र येणार आहेत. त्यानंतर नागठाणे स्टँड परिसरातील पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. शासन किंवा प्रशासनाने उपसा बंदीबाबत सकारात्मक आणि लेखी निर्णय दिल्यास आंदोलनाचा पुढील विचार करण्यात येईल, अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा संघटनेने दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून न्याय न मिळाल्यास आंदोलनात सहभागी होण्याचे आश्वासन दिल्याचे संघटनेने म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी, विविध शेतकरी संघटना, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, युवक व महिलांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेळके यांनी केले आहे.