धमक्यांना घाबरत नाही, आता मी स्वतः दिल्लीला जाणार - अभिजित दिपकेंच्या वडिलांचा निर्धार, आंदोलकांच्या मागण्यांमध्ये काहीही वावगे नाही

by Team Satara Today | published on : 18 July 2026


छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज २१ वा दिवस असताना दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना उपोषणाच्या मंचावरून उचलले आणि रुग्णालयात दाखल केले. या कारवाई दरम्यान तेथून जवळच मित्राच्या घरी असताना बेदम मारहाण केल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला. पोलिसांच्या या अमानुष मारहाणीनंतरही न झुकता अभिजीतने जंतरमंतरवरूनच बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे वडील भगवानराव दिपके यांनी सरकारवर सडकून टीका केली असून स्वतः दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

आंदोलकांच्या मागण्यांमध्ये काहीही वावगे नाही

मुलाच्या या आक्रमक भूमिकेनंतर छत्रपती संभाजीनगरातील त्याचे वडील भगवानराव दिपके यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले की, "माझा मुलगा अभिजीत आणि त्याचे सहकारी ज्या मागण्यांसाठी दिल्लीत बसले आहेत, त्या अत्यंत न्याय्य आहेत. शिक्षण व्यवस्थेतील गैरकारभारामुळे नीट पेपर फूटीने आत्महत्या केलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या पालकांना केंद्र सरकारने तातडीने १ कोटी रुपयांची आर्थिक भरपाई द्यावी आणि या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, हीच त्याची मुख्य मागणी आहे. देशाच्या हितासाठी केलेल्या या मागण्यांमध्ये काहीही वावगे नाही, मग तरीही सरकार यावर गप्प का आहे?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे लोकशाही सरकार आहे की झुंडशाही?

पुढे बोलताना भगवानराव दिपके यांनी केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणावर जोरदार प्रहार केला. "केंद्र सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, हे देशातील लोकांचे लोकशाही सरकार आहे, कोणतीही झुंडशाही किंवा टोळीचे सरकार नाही. लोकशाहीत नागरिकांच्या आणि तरुणांच्या मागण्यांवर सकारात्मक काम करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य असते. मात्र दुर्दैवाने मागचे तीन आठवडे झाले तरी सरकारचा एकही अधिकृत प्रतिनिधी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी जंतरमंतरवर गेला नाही. यावरून स्पष्ट होते की सरकारला विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवायच्या नसून हे आंदोलन बळाचा वापर करून पूर्णपणे चिरडून टाकायचे आहे. देशात हुकूमशाही आणि झुंडशाही आणण्याचा हा प्रयत्न आहे. 

स्वतः दिल्ली गाठून आंदोलनात होणार सामील

एका बापाची काळजी आणि देशाच्या लढ्याप्रती असलेले कर्तव्य स्पष्ट करताना भगवानराव दिपके म्हणाले की, "दिल्लीत सध्या ज्या प्रकारे पोलिसांचा अमानुष छळ सुरू आहे आणि अभिजितवर जो प्राणघातक हल्ला झाला आहे, ते पाहता एक वडील म्हणून मला त्याची आणि त्याच्या आरोग्याची खूप काळजी वाटत आहे. मात्र, त्याला तिथे एकटे सोडणे मला मान्य नाही. म्हणूनच, मी आता घरात शांत बसणार नाही, तर मी स्वतः तातडीने दिल्लीला रवाना होत आहे. जंतरमंतरवर जाऊन मी स्वतः माझ्या मुलाच्या बाजूला बसून आंदोलनात थेट सहभागी होणार आहे."


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा सुरू झाला; कोयना पाणलोट क्षेत्रातही उघडझाप, धरणसाठ्यात अल्प वाढ
पुढील बातमी
रत्नागिरीचा भावेश नीट परीक्षेत एसटी प्रवर्गात राज्यात पहिला, देशात चौथा क्रमांक, भावेशला ७२० पैकी ६६६ गुण मिळाले

संबंधित बातम्या