पुणे विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण रद्द

by Team Satara Today | published on : 07 August 2025


पुणे : पुणे विमानतळावर पुणे-भुवनेश्वर विमानाला पक्षी धडकल्यामुळे उड्डाण रद्द करण्यात आलं आहे. विमानतळांवर वारंवार कुत्रे बिबट्या,पक्षी, येण्याचे प्रमाण वाढल्याने प्रवासाच्या सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे विमानतळवरून भुवनेश्वरला उड्डाणाच्या तयारीत असलेलं 1098 हे विमान रद्द करावं लागलं आहे. पक्षी धडकल्यामुळे विमानाच्या एका बाजूचे पाच ब्लेड निकामी झाले, हा प्रकार वेळीच पायलटच्या लक्षात आल्यामुळे विमान उड्डाण रद्द करण्यात आले.

पुण्याहून भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1098 विमानाला उड्डाणादरम्यान पक्षी धडकल्याची घटना बुधवारी (7 ऑगस्ट) घडली. या विमानामध्ये 140 प्रवासी होते. धावपट्टीवर वेग घेत असताना उजव्या बाजूच्या इंजिनाला पक्षी आदळल्यामुळे विमानाचे पाच ब्लेड निकामी झाले. पायलटच्या सतर्कतेमुळे वेळेवर उड्डाण थांबवण्यात आले आणि मोठा अपघात टळला. मात्र परिणामी, हे उड्डाण रद्द करण्यात आले आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

याच विमानाच्या सीट क्रमांक 22 डी वरील प्रवासी मोहम्मद नदीम यांनी TOI शी बोलताना सांगितले की, "इंजिनने वेग वाढवल्यानंतर त्यातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. त्यानंतर लगेचच, पायलटने ब्रेक दाबले आणि विमान थांबले. ब्रेक इतके जोरात लागले की काही प्रवाशांचे फोन खाली पडले आणि एका महिलेच्या हातातून तिचं मूल जवळजवळ खाली पडलं."

विमानाचा वेग नेहमीच पायलट ठरवतो. वेगाचे तीन प्रकार आहेत - V1 (निर्णय गती), VR (रोटेशन गती) आणि V2 (टेक-ऑफ सुरक्षा गती). V1 ही कमाल वेग मर्यादा आहे ज्यावर पायलट आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे टेक-ऑफ थांबवू शकतो.

एअर इंडिया एक्सप्रेसचं IX-1098 हे विमान सायंकाळी 4:05 वाजता भुवनेश्वरकडे रवाना होणार होतं. विमानात दीडशेपेक्षा अधिक प्रवासी होते. नियोजित वेळेनुसार विमान धावपट्टीवर गेलं आणि उड्डाणासाठी वेग घेत असतानाच उजव्या इंजिनात पक्षी आदळला.

पायलटच्या त्वरित लक्षात आलं आणि उड्डाण थांबवलं, विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये आणलं. जर हा प्रकार हवेत घडला असता, तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, अशी माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलने दिली आहे.

पुणे विमानतळावर गेल्या पाच वर्षांमध्ये 145 बर्ड हिटच्या घटना, तर 2025 मध्ये आतापर्यंत 12 घटना घडल्या आहेत. बुधवारी घडलेली ही बारावी घटना आहे. यामुळे पुणे विमानतळावरील प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आगारातून सोडणार जादा बसेस
पुढील बातमी
शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्राधान्याने कार्यवाही करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या