राज्य परिवहन महामंडळाचे राज्यातील तब्बल ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद; तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन उदासीन

by Team Satara Today | published on : 13 March 2026


सातारा  : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर दिलेले बसस्थानक व आगारांचे अधिकृत संपर्क क्रमांक मोठ्या प्रमाणात बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'सुराज्य अभियान'ने केलेल्या तपासणीत राज्यातील तब्बल ७२ टक्के संपर्क क्रमांक बंद किंवा प्रतिसाद न देणारे असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. १३) रोजी सातारा, सिंधुदुर्ग, जळगाव, अकोला आणि सांगली येथे पत्रकार परिषद घेत सुराज्य अभियान पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

'सुराज्य अभियान'तर्फे सातारा येथे विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना तक्रारवजा निवेदन देण्यात आले. प्रवाशांच्या अडचणी तातडीने सोडवून संपर्क व्यवस्था कार्यरत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राहुल कोल्हापुरे, अधिवक्ता दत्तात्रय कुलकर्णी, सौ. रुपा महाडिक आदी उपस्थित होते.

अभियानाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, प्रवाशांना बसच्या वेळा, आरक्षण किंवा इतर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत क्रमांकावर संपर्क करावा लागतो; मात्र बहुतांश क्रमांक बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात गेल्या तीन महिन्यांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

'सुराज्य अभियान'ने बसस्थानके व आगार मिळून एकूण ४१३ संपर्क क्रमांकांची पडताळणी केली. त्यापैकी केवळ ११७ क्रमांक (२८ टक्के) कार्यरत आढळले, तर २९६ क्रमांक (७२ टक्के) बंद किंवा प्रतिसाद न देणारे असल्याचे निष्पन्न झाले. सातारा जिल्ह्यातील काशीळ, कोरेगाव, रहिमतपूर, वाठार स्टेशन, फलटण, वाई, पाचगणी आणि वडूज या बसस्थानकांतील संपर्क क्रमांकांची स्थितीही अशीच असल्याचे निदर्शनास आले.

'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान'अंतर्गत बसस्थानकांची रंगरंगोटी केली जात असली तरी प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सुराज्य अभियानचे सातारा जिल्हा समन्वयक राहुल देवीदास कोल्हापुरे यांनी सांगितले. बसस्थानकांच्या दूरध्वनी व्यवस्थेसाठी दरमहा निधी मंजूर असताना प्रवाशांना सुविधा का मिळत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मोबाईल क्रमांक उपलब्ध करून तो संकेतस्थळावर त्वरित अद्ययावत करा

प्रत्येक बसस्थानक व डेपोसाठी अधिकृत मोबाईल क्रमांक उपलब्ध करून तो संकेतस्थळावर त्वरित अद्ययावत करावा, तसेच अधिकृत क्रमांक निष्क्रिय ठेवणाऱ्या किंवा फोन न उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सेवा-त्रुटी मानून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बसस्थानकांच्या नियमित तपासणीत संपर्क यंत्रणेची पाहणी अनिवार्य करण्याचीही मागणी करण्यात आली. दरम्यान, बस्थानकातील समस्यांवर तात्काळ तोडगा न निघाल्यास प्रसंगी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सुराज्य अभियानने दिला आहे. तसेच संपर्क व्यवस्थेसाठी असणारा निधी नेमका कुठे खर्च होतो याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा 29 मार्चला; निरक्षरांना साक्षरतेकडे नेण्यासाठी राज्यभर विशेष उपक्रम
पुढील बातमी
गॅस टंचाईबाबत महाविकास आघाडीचे साताऱ्यात आंदोलन; गॅस पुरवठा नियमित व सुरळीत करण्याची मागणी

संबंधित बातम्या