सातारा वाहतूक पोलिसांचा दणका; मुजोर थार चालकांच्या गाड्यांवरील 'ब्लॅक फिल्मिंग' जागीच टरटर फाडले

by Team Satara Today | published on : 23 October 2026


सातारा: "माझ्याकडे थार आहे, म्हणजे रस्ता माझ्या बापाचा," अशा तोऱ्यात फिरत सातारा शहर व जिल्ह्यात उच्छाद मांडणाऱ्या आणि मुजोरी करणाऱ्या ठराविक थार चालकांना अखेर सातारा शहर वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. शहर आणि परिसरात नियम धाब्यावर बसवून दहशत निर्माण करणाऱ्या या चालकांवर वाहतूक शाखेने धडक कारवाई करत त्यांच्या कारवरील ब्लॅक फिल्मिंग जागीच टरटर फाडले असून, या कारवाईमुळे सामान्य दुचाकी व चारचाकी वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध युट्यूब चॅनलवर सातारा शहरातील थार कारबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर सातारा शहर वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेत काल या मुजोर चालकांवर विशेष मोहीम उघडली.
शहरातील प्रमुख मार्गांवर ही धडक कारवाई राबवण्यात आली असून, बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्कल या दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी अचानक नाकाबंदी लावली. याठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून फिरणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान एमएच ११ डीएल ७९७०, एमएच ११ सीझेड ७२५२ आणि एमएच ११ डीव्ही ०००३ या तीन थार गाड्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांनी संबंधित वाहनांच्या काचेवरील ब्लॅक फिल्म जागीच काढून टाकत मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार वाहन चालकांवर कायदेशीर व आर्थिक दंड आकारला.
दरम्यान, वाहनांना ब्लॅक फिल्म लावू नये, असे स्पष्ट आवाहन सपोनि राजेश माने यांनी केले आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. यापुढील काळातही सातारा शहर वाहतूक शाखेतर्फे अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने सुरूच राहणार असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन सातारा शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि राजेश माने यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोळकी येथे खाजगी क्लासमध्ये बालकाला मारहाण; इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण करून घेतल्याप्रकरणी शिक्षिकेसह इतरांवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या