विरोधकांवर हक्कभंग आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

राऊतांचे आरोप फेटाळत मंत्री जयकुमार गोरे यांचा खुलाशासहित इशारा

by Team Satara Today | published on : 05 March 2025


मुंबई : माझ्याबाबत विरोधकांनी जे आरोप केलेत ते वस्तूस्थितीला धरून नाहीत. विरोधक ज्या प्रकरणावरून माझ्यावर आरोप करताहेत त्यात कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली आहे. देशात सर्वोच्च व्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे विरोधक काय म्हणतात याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. विरोधकांनी वस्तूस्थिती माहिती करून घ्यावी. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांच्यावर हक्कभंग आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला आहे.

जयकुमार गोरे हे विकृत मंत्री आहेत त्यांची अमित शाहांकडे तक्रार करणार आहे. ही महिला पुढच्या काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला होता.

खासदार राऊतांच्या आरोपांनंतर जयकुमार गोरे यांनीदेखील माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 2017 साली विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. 2019 मध्ये त्याबाबत न्यायालयाचा निकालही आला. माझी त्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. मी असे कोणतेही फोटो पाठवले नाही. तसेच, जप्त मुद्देमाल आणि  इतर गोष्टीही नष्ट कऱण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या देशात लोकशाही आहे, लोकशाहीत सर्वोच्च न्यायालय आहे. कोर्टाच्या निकालाला 6 वर्ष झालीत. या घटनेला सहा वर्षे झाली. सहा वर्षांनंतर हा मुद्दा पुन्हा समोर आला. किमान आपण कुठल्या वेळी हा विषय बोलावा आणि कुठल्या वेळी काय समोर आणावं हे विरोधकांनीही याची विरोधकांनीही मर्यादा ठेवली पाहिजे. ज्या वडिलांनी माझ्यासाठी संघर्ष केला, मला शिकवलं, वाढवले आणि इथपर्यंत आणलं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अस्थी विसर्जनही करू दिले नाही. इतक्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी केले, असाही आरोप त्यांनी केला. विरोधकांनी खालच्या पातळीचं राजकारण करू नये. राजकारणात अनेक गोष्टी असतात. पण मी जबाबदारपणे काम करतो. मी एवढचं सांगतो की या घटनेवर कोर्टाने निकाल दिला आहे. ज्यांनी-ज्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. त्या सर्वांवर मी हक्कभंगाचा प्रस्ताव सभागृहात मांडणार आहे.

तसेच, माझ्यावर आरोप करणार्‍यावर मी अब्रुनुकसानीचाही खटला दाखल करणार आहे. या प्रकरणावर जी कारवाई करणे गरजेचे आहे ती सर्व कारवाई मी करणार आहे. जयकुमार गोरेंनी महिलेला त्रास दिला की नाही दिला, यासंदर्भात पोलिसांनीच चौकशी करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी. जे कोणी माझ्याविरोधात कट रचत आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर पीएमपीएमएल अलर्ट
पुढील बातमी
धनंजय मुंडेंनी राजीनामा देताच जरांगे पाटलांनी केली मोठी मागणी!

संबंधित बातम्या