सातारा : आयुष्याच्या संध्याकाळी प्रेम, विश्वास आणि सेवा यांची खूप आवश्यकता असते .वृद्धांना हे प्रेम मिळाले तर त्यांच्या जगण्याचा आनंद द्विगुणीत होतो. काहीसा असाच समृद्ध अनुभव समता वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आला. सातारा- रहिमतपूर मार्गावरील समता वृद्धाश्रमामध्ये रमिजा सय्यद, विलास जावळे, शेखर कांबळे आणि यशेंद्र क्षीरसागर या गायकांनी आपली गायन कला मोठ्या आनंदाने सादर केली.
ज्येष्ठांना केवळ प्रेमळ सहवासच पुरेसा असतो. मात्र यावेळी सहवासाबरोबरच सुंदर गीत गायन गायकांनी सादर केले आणि तेही त्यांच्या संगतीत! त्यामुळे या जेष्ठांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शेखर कांबळे यांनी "गीत गाता चल" हे अत्यंत सुंदर गीत सादर केले. श्री .क्षीरसागर यांनी "बडी मस्तानी है, मेरी मेहबूबा" हे जीने की राह या चित्रपटातील गीत सादर केले. तसेच देवीचे "गार डोंगराची हवा, बाईला सोसना गारवा" हे गीत दमदार आवाजात सादर केले आणि सर्वांची मने जिंकली. "मै कही कवी ना बन जाऊ, तेरे प्यार में ए कविता" हे गीत विलास जावळे यांनी अत्यंत दर्जेदार पद्धतीने सादर केले आणि मोहम्मद रफी यांच्या आठवणी ताज्या झाल्या.
रमीजा सय्यद यांनी "जिंदगी हर कदम एक नई जंग है ;जीत जायेंगे हम तू अगर संग है" हे मेरी जंग या चित्रपटातील अर्थपूर्ण गीत मधुर आवाजात सादर केले. रमीजा सय्यद यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन केले. प्रस्तुत गायकांना एकत्र केले आणि वेळेनुसार नियोजन केले. वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती संगीता माने यांनी पूर्ण सहकार्य केले. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सर्व गायक यांना समाधान वाटले. या सुंदर आठवणी घेऊनच गायकांनी जड अंत:करणाने सर्व ज्येष्ठांना निरोप दिला.