सातारा : सातारा शहरात एका शिक्षिका महिलेच्या घरात विनापरवानगी प्रवेश करून तिच्याशी गैरवर्तन व धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, १५ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील साकिब मुबारक नदाफ, कैफ बागवान आणि त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती संबंधित महिलेच्या निवासस्थानी पोहोचले. घरातील व्यक्तीची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी महिलेने कारण विचारल्यावर आरोपींनी उद्धट वर्तन करत तिच्याशी अयोग्य प्रकारे वागणूक दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. विरोध केल्यानंतर महिलेला व तिच्या नातेवाईकाला धमकी देत आरोपी तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.