सातारा : पावसाने उघडीप दिल्यानंतर सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील तुंबलेल्या नाल्यांच्या साफसफाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे. राजपथ, राधिका रोड आणि कर्मवीर पथ परिसरातील नाल्यांची युद्धपातळीवर स्वच्छता सुरू करण्यात आली असून आरोग्य सभापती धनंजय जांभळे स्वतः सकाळपासून घटनास्थळी उपस्थित राहून कामाचा आढावा घेत कर्मचार्यांना मार्गदर्शन करताना दिसले.
या मोहिमेसाठी तब्बल 45 कर्मचार्यांचे पथक नियुक्त करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने तीन प्रमुख मार्गांवरील नाल्यांची साफसफाई केली जात आहे. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि अडथळे हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याचे काम करण्यात आले.
राजपथावरील व्यापारी पेठेतील व्यापार्यांनी नाल्यातून काढलेला गाळ तातडीने उचलून नेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आरोग्य विभागाने तत्काळ गाळ व कचरा हटवून परिसर स्वच्छ केला.
दरम्यान, व्यापारी वर्गाने आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले. राधिका रस्ता, कर्मवीर रस्त्यासह शहरातील तुटलेल्या गटारांची यादीही आरोग्य विभागाने तयार केली असून दोन टप्प्यांत नालेसफाई व दुरुस्ती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती धनंजय जांभळे यांनी दिली.