सातारा : पाण्याची मोटर चोरणाऱ्या चोरट्यास जेरबंद करण्यात मल्हारपेठ पोलिसांनी यश मिळवले आहे.
सुदर्शन सुरेश लोहार रा. विहे, ता. पाटण असे मोटर चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी सुळेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत देवबा शेजवळ यांच्या विहिरीतील पाणी टँकरमध्ये भरण्यासाठी ठेवलेली 18 हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेली म्हणून अधिक ज्ञानदेव पाटील रा. कळकेवाडी, ता. पाटण, जि. सातारा यांनी मल्हारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
त्या अनुषंगाने घटनास्थळी मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी तात्काळ भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना मल्हार पेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय बातमीदार मार्फत काही लोकांची माहिती प्राप्त झाली. त्या दृष्टीने तपास केला असता त्यामधील एकाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. म्हणून त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित इलेक्ट्रिक मोटर चोरली असल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या ताब्यातील संबंधित मोटार जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक सुनीता शेळके, पोलीस हवालदार पाटील, पगडे, पोलीस कॉन्स्टेबल पवार यांनी सहभाग घेतला.