सातारा तालुक्यातील तासगाव येथे विहिरीत पडून १६ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; घटनेने गावात हळहळ

by Team Satara Today | published on : 11 March 2026


सातारा : सातारा तालुक्यातील तासगाव गावच्या हद्दीत असलेल्या विहिरीतील पाण्यात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय शाळकरी युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वरद शिवप्रसाद देशपांडे हा एकुलता एक मुलगा दि. १०  रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गावातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे इतर सहकारी देखील पोहण्याचा आनंद घेत होते. दरम्यान, विहिरीवरून खाली पाण्यामध्ये उडी मारताना तोल गेल्याने वरद हा विहिरीतील मोटारीवर पोटाच्या बाजूने पडला. त्यामुळे त्याच्या छातीला गंभीर मार लागला. त्यानंतर विहिरीमध्ये असलेल्या वायरिंगमध्ये तो जाऊन अडकल्याने त्याचा श्वास गुदमरला यामध्येच त्याचा मृत्यू झाला. 

सोबत असलेल्या मित्रांनी त्याला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी दरम्यान सांगितले. वरद हा एकुलता एक मुलगा असून अभ्यासात तो हुशार होता. त्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. याबाबतची फिर्याद चुलते अमितकुमार मोहन देशपांडे (वय ४७, रा. धामणेर, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
19 वर्षीय तरुणी यात्रेत बेपत्ता झाल्याची बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपाजवळ शिक्षक कॉलनीत लॅपटॉपची चोरी; तरुणीवर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या