सातारा : आयुष विभागामार्फत स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ११ वा आयुर्वेद दिवस आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सदर दिवसाची संकल्पना निरोगी उद्यासाठी आयुर्वेद अशी होती तसेच 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 ह्या कालावधीत सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण माह याचेही आयोजन नर्सिंग कॉलेज सातारा तसेच जिल्हा रुग्णालय सातारा यांच्यातर्फे करण्यात आले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अतुल लिपारे, डॉ. उल्का झेंडे, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. अरुंधती कदम, डॉ. स्मिता लोंढे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ.राहुल जाधव यांनी निरोगी जीवनासाठी आयुर्वेद महत्वाचा असून त्यात सांगितलेल्या दिनचर्या, आहार, विहार इत्यादी संकल्पनाचे पालन दैनंदिन जीवनात केले पाहिजे, असे प्रतिपादन केले तसेच आयुर्वेद दिवस हा दरवर्षी देशभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असल्याचे नमूद केले. आयुष विभाग जिल्हा रुग्णालय येथे बरेच रुग्ण उपचार घेत असून अनेकांना आयुष उपचार पद्धतीचा लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोषण माह याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत गर्भिणी अवस्थेत उपयोगी पडणार आहार, संतुलित आहार, आयुर्वेदिक पाककृती, प्रसूती पश्चात घ्यायचा आहार आणि पाककृती यांचे स्टॉल नर्सिंग कॉलेज मधील विद्यार्थी आणि परिचारिका यांनी मांडले होते आणि उपस्थित रुग्णांना पोषक आहाराविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिथुन पवार, जिल्हा आयुष अधिकारी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. संजीवनी शिंदे यांनी केले. डॉ. विनोद तांबवेकर यांनी आभार मानले.
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आयुष विभागामार्फत ११ वा आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा
by Team Satara Today | published on : 23 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा