सातारा : सातारा शहरानजीक असणाऱ्या कृष्णा नदीत अंघोळीसाठी गेलेल्या एका जूनियर आर्टिस्ट व डान्सर सौरभ शर्मा याचा मृत्यू झाल्यानंतर इन्शुरन्स कंपनीने क्लेमचे पाठवलेले १५ लाख रुपये 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते रितेश देशमुख यांनी त्या डान्सरच्या आईच्या खात्यावर ट्रान्सफर करून आपला शब्द पाळला.
साधारण दोन महिन्यांपूर्वी 'राजा शिवाजी' या चित्रपटाचे शूटिंग संगम माहुली, ता. सातारा परिसरात सुरू होते. या चित्रपटात मूळचा जोधपुर येथील मात्र मुंबई येथे चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा सौरभ शर्मा हा डान्सरचे काम करत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते म्हणून रितेश देशमुख काम करत होते. चित्रपटाच्या एका गाण्याचे शूटिंग सुरू होते. या शूटिंगमध्ये हळदीचा सीन असल्याने सर्वांच्या अंगाला आणि कपड्यांना हळद लागली होती. वेशभूषेवर हळद लागल्याने सौरभ शर्मा आपल्या सहकाऱ्यांसह नदीवर अंघोळीसाठी गेला होता. तेव्हा त्याचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाला होता. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. या घटनेची माहिती मिळतात अभिनेता आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्माते जेनेलिया देशमुख, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा हे घटनास्थळी दाखल झाले होते. सौरभ शर्मा याच्या मृत्यूनंतर रितेश देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. रितेश देशमुख यांना ज्या दिवशी इन्शुरन्स कंपनीने क्लेमचे पैसे पाठवले, त्यादिवशी सौरभ शर्मा याच्या आईच्या अकाउंट मध्ये १५ लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. सौरभ शर्मा यांच्या कुटुंबासाठी रितेश देशमुख यांनी केलेल्या मदतीतून त्यांची माणुसकी स्पष्टपणे दिसून येते अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.