महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती

by Team Satara Today | published on : 01 August 2025


कराड : महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर महत्वाचे फेरबदल करण्यात आले असून शिवराज मोरे यांची प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवक कॉंग्रेस मधील संघटनात्मक पातळीवरील हे महत्वाचे फेरबदल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार करण्यात आले आहेत. शिवराज मोरे यांना नुकतेच दिल्ली येथे युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या तसेच राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

शिवराज मोरे यांनी याआधी विद्यार्थी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची दोनदा जबाबदारी सांभाळली असून युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस व उपाध्यक्ष पदाची निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्ती सुद्धा झाली होती. प्रदेश युवक कॉंग्रेसच्या तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिवराज मोरे यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती.

एका सामान्य कुटुंबातील शिवराज मोरे यांनी आपल्या संघटनेच्या जोरावर राज्यभर आपले युवकांचे संघटन वाढवले आहे. या नियुक्तीमुळे राज्यभरातून युवक कॉंग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांना ताकद मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

 यावेळी युवक कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर मोठा विश्वास दाखवलेला आहे, काम करण्याची संधी दिली आहे. त्या विश्वासाला पात्र राहून मी पुढील काळात वाटचाल करणार आहे. कॉंग्रेस पक्षाची युवक संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी राज्यभर काम करणार आहे. कॉंग्रेस पक्ष हा सर्वात अनुभवी राजकीय पक्ष आहे. पक्षाचा सद्याचा काळ हा संघर्षाचा काळ असून या परिस्थितीत कॉंग्रेस पक्षाचे कार्य गावागावात पोहचविण्यावर माझा प्रयत्न राहील आणि यासाठी पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यावर भर दिला जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच अडकणार लग्नबंधनात
पुढील बातमी
उरमोडी डावा कालवा प्रकल्पग्रस्तांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

संबंधित बातम्या