सातारा : शिवरायांच्या इतिहासाशी तोडमोड करणाऱ्यांना अखेर गुडघे टेकावे लागले आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने (Oxford University Press India) खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जाहीर माफी मागितली असून, हा शिवप्रेमींचा आणि सातारा गादीचा मोठा विजय मानला जात आहे.
२००३ साली प्रकाशित झालेल्या 'Shivaji: Hindu King in Islamic India' या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. या पुस्तकाच्या पान क्रमांक ३१, ३३, ३४ आणि ९३ वर महाराजांबद्दल केलेली विधाने कोणत्याही योग्य पडताळणीशिवाय छापल्याचे आता खुद्द ऑक्सफर्ड प्रकाशनानेच कबूल केले आहे.
"सदर मजकुराची सत्यता न पडताळता तो प्रकाशित केला गेला, ज्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या," असे स्पष्ट करत प्रकाशन संस्थेने आपली चूक मान्य केली आहे. याबाबत वर्तमानपत्रात जाहीर नोटीस प्रसिद्ध करून त्यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि जनतेला झालेल्या त्रासाबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण
या माफीनाम्यामुळे इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण असून, ऐतिहासिक महापुरुषांबद्दल लेखन करताना लेखकांनी आणि प्रकाशकांनी यापुढे हजारदा विचार करावा, असा सणसणीत इशारा या घटनेतून मिळाला आहे.