सातारा : महाराष्ट्र शासनाकडून मान, सन्मानचा दिला जाणारा पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कार सी. पी राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या अनवडी गावातील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील तथा महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण संघाचे राज्य सचिव दिपक गिरीगोसावी यांना 15 ऑगस्ट रोजी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात शंभूराज देसाई मंत्री उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जिल्हा सातारा यांच्या कडून प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व 25 हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णयानुसार गाव पातळीवर कायदा व व्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे, लोकन्यायालयात पंच म्हणून कार्य करून प्रकरणे निकाली काढण्यास मदत करणे, पोलीस तपासात अत्यंत गंभीर व इतर गुन्ह्यातील आरोपीची गुप्त माहिती व ठावठिकाणा काढून त्यांना पकडून देण्यासाठी व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मदत करणे, गावतील सण, उत्सव, यात्रा निवडणूका या सर्वच घडामोडीवर लक्ष ठेवून त्या शांततेत पार पाडणे तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे निमंत्रक म्हणून काम पाहणे अशा कामात केलेल्या अतुलनीय साहस, धाडस व शौर्य यासाठी हा पुरस्कार राज्यपाल यांच्या वतीने पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्ह्याच्या ठिकाणी पुरस्कारार्थीस सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतो. तसेच महसूल विभागाकडून पोलीस पाटील संवर्गातून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून खर्शी (तर्फ कुडाळ) गावचे पोलिस पाटील सुहास भोसले यांना पुरस्कार देण्यात आला तसेच सातारा प्रांत कार्यालयाकडून मस्करवाडी, ता. सातारा गावचे पोलीस पाटील विलास माने यांना प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांचे हस्ते उल्लेखनिय सेवेबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
मागील जवळपास एक वर्षापासून सातत्याने सातारा जिल्ह्यात विशेष उल्लेखनीय सेवा राज्यपाल पुरस्कार मिळावा यासाठीचा पाठपुरावा दिपक गिरीगोसावी यांनी केला. दरम्यान त्यांना रमेश गर्जे सपोनि भुईंज पोलीस ठाणे यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले. यानंतर समीर शेख पोलीस अधिक्षक, राजेंद्र कचरे उपविभागीय दंडाधिकारी वाई, सोनाली मेटकरी-शिंदे तहसिलदार वाई, यांनीही त्यांचा वैयक्तिक सत्कार करून पुढील कामगिरीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर पोलीस पाटील एकीकरणचे राज्याध्यक्ष प्रविण राक्षे, बबन पाटील, विष्णू लोहार, महेश रोकडे, आसीफ मोकाशी, विक्रम भोसले आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
दिपक गिरीगोसावी यांना राज्यपाल पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्यासह राज्यातील पोलीस पाटील यांना त्यांचेकडून प्रेरणा मिळाली आहे. राज्यातील संघटना व इतर मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करून पुढील कामगिरीस त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
अनवडी पोलीस पाटील राज्यपाल पुरस्काराने सन्मानित...!
राज्यपाल पुरस्कार घेणारे जिल्ह्यातील पहिलेच मानकरी
by Team Satara Today | published on : 21 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा