सातारा : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, भाषा मंडळ, अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळ आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) 'रंग मराठीचे, शब्द कवितेचे' या विशेष काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कविता वाचनाचा उत्सव सकाळी ११:३० वाजता छत्रपती शिवाजी कॉलेजमधील लोकनेते रामशेठ ठाकूर अभ्यासिका येथे संपन्न होणार असून, या निमित्ताने साताऱ्यात 'कवितेचा जागर' होणार आहे.
मराठी भाषेचा स्वाभिमान विद्यार्थ्यांमध्ये जागवणे, त्यांच्यात वाचन व लेखनाची आवड निर्माण करणे आणि भाषिक संस्कार दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात कुसुमाग्रज, बा.भ. बोरकर,मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, शांताबाई शेळके आणि सुरेश भट यांसारख्या दिग्गज कवींच्या व मराठी साहित्य प्रवाहातील विविध आधुनिक कवींच्या कवितांचे वाचन केले जाणार आहे. विद्यापीठातील व सातारा परिसरातील नवोदित कवी-कवयित्रींना त्यांच्या स्वरचित कविता सादर करण्यासाठी या निमित्ताने एक 'आनंदघन काव्य मंच' उपलब्ध करून देण्यात आला असून, याद्वारे कवींना आपल्या विविध भावनांचा आविष्कार करण्याची संधी मिळणार आहे.
सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून विद्यापीठातील तसेच सातारा परिसरातील कवींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भाषा मंडळाचे प्रभारी संचालक व मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे आणि कवितेची लिखित प्रत समन्वयक प्रा. श्रीकांत भोकरे यांच्याकडे कार्यक्रमापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. केवळ समितीने मान्यता दिलेल्या कवितांचेच वाचन केले जाईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. श्रीकांत भोकरे (मराठी विभाग) आणि अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश बाबर हे जबाबदारी पाहत आहेत. मराठी गौरवदिनानिमित्त आयोजित या काव्यमैफलीचा आनंद घेण्यासाठी साताऱ्यातील साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.या विशेष काव्यवाचन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील डॉ.आबासाहेब उमाप,डॉ.विद्या नावडकर,डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.प्रियांका कुंभार,प्रा.श्रीकांत भोकरे व अजिंक्यतारा मराठी भाषा प्रसार युवक मंडळाचे युवा कार्यकर्ते कवींशी संपर्क करत आहेत.