सातारा : सातारा शहरामधील रविवार पेठेतील हॉटेलचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी 7 घरफोड्या केल्याची कबुली देवून 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांना दिला.
संतोष रामचंद्र गावडे (वय 38, रा. बेंडवाडी पो. आसनगाव ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हॉटेलमधून मोबाईल, रोख रक्कमची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग (डीबी) तपास करत होते. पोलीस माहिती घेत असताना रात्रीचे दुकाने फोडून चोरी करणार्या संशयित आरोपींची रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली. यामध्ये संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच अन्य 6 ठिकाणी देखील दुकानामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले.
पोलिसांनी चोरट्याकडे अधिक माहिती घेतली असता त्याने यापूर्वी सातारा शहर तसेच शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी केल्याचे सांगितले. त्याच्यावर आतापर्यंत घरफोडीचे 17 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी संशयिताकडून चोरीचे 2 मोबाईल फोन, रोख रक्कम 4000, गुन्हयामध्ये वापरण्यात आलेली मोटरसायकल असा एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोनि राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलीस निलेश यादव, सुनिल मोहिते, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.