पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडिज फलंदाजांनी तिसऱ्या दिवशी कूर्मगती खेळी करून भारतीय गोलंदाजांना रोखले होते; पण मोहम्मद सिराजने चौथ्या दिवशी सकाळी वेस्ट इंडिजच्या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले. त्यामुळे भारताने मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात रविवारी वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांत गुंडाळून पहिल्या डावात १८३ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजने ५ बाद २२९ अशी मजल मारताना भारतीय गोलंदाजांच्या संयमाची परिक्षा पाहिली होती. वेस्ट इंडिजच्या संघाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराजने मोठी भूमिका बजावली.
भारताने तिसऱ्या दिवसअखेर घेतलेला दुसरा नवा चेंडू चांगलाच स्विंग झाला होता. चौथ्या दिवशी सिराजने नेमके हेच करीत विंडीजच्या अखेरचे पाच फलंदाज चौथ्या दिवशी ७.४ षटकांत बाद केले. सिराजने निम्मा संघ बाद करण्यात यश मिळवले. गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी मैदानात येऊन सिराजचे कौतुक केले. कसोटी पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने अॅथनेझला पहिल्याच षटकांत चकवले. त्यानंतरच्या षटकांत सिराजने होल्डरला बाद केले. विंडीजने फॉलोऑनची नामुष्की टाळली, पण सिराजने विंडीज अडीचशेच्या फार पल्याड जाऊ शकणार नाहीत, याची खबरदारी घेतली.
मोहम्मद सिराजने ११०व्या षटकात स्टार अष्टपैलू जेसन होल्डरला बाद करून तुफान सुरुवात केली. त्यानंतर त्याने ११२व्या षटकात अल्झारी जोसेफला बाद केले, त्यानंतर केमार रोच आणि शॅनन गॅब्रिएलला ११६व्या षटकात बाद करत यजमानांना २५५ धावांत गुंडाळले. भारताला १८३ धावांची मोठी आघाडी मिळाली.
मोहम्मद सिराजची २३.४-६-६०-५ अशी प्रभावी स्पेल होती, जो कसोटी क्रिकेटमधील एका डावातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. यावर भाष्य करताना माजी फलंदाज वसीम जाफरने ट्विटरवर मोहम्मद सिराजचे कौतुक केले. त्याने लिहिले - निर्जीव खेळपट्टीत सिराजने ओतला जीव; शानदार गोलंदाजी मियाँ.
सिराजच्या प्रभावी आऊटस्विंगरचा तसेच वेगाने आत येणाऱ्या चेंडूंचा सामना करणे विंडीजच्या तळाच्या फलंदाजांच्या आवाक्याबाहेरचे होते. विंडीजला चौथ्या दिवशी पाच विकेट गमावताना केवळ २६ धावाच करता आल्या.