खंडाळा : केसुर्डी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनी कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या सहकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली. यामध्ये परेश प्रदीप गायकवाड (वय37) हा युवक केसुर्डीतील एका कंपनीमध्ये कामाला होता. आजारपणामुळे 19 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने परेशचे आई-वडील, पत्नी, मुलगी (१० वर्षे) व मुलगा (८ वर्षे), भाऊ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक प्रश्न या कुटुंबापुढे उभे राहिले. अशा परिस्थितीत परेशच्या परिस्थितीची जाण कंपनीतील सहकाऱ्यांना होती. सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपत मृत सहकार्याच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे ठरवले. यासाठी 160 कामगारांनी मिळून जवळपास 85 हजार रुपये जमा केले. जमा केलेले पैसे रविवारी (दि.14) खंडाळ्यात येऊन परेशच्या कुटुंबीयांना मदत स्वरूपात दिले. कंपनीतील सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एका मृत झालेल्या सहकार्याच्या कुटुंबीयांची मदत केल्याबद्दल खंडाळा ग्रामस्थांनी या कामगारांचे आभार मानले