सातारा, दि. ११ : येथील राधिका रोडवरील दारू दुकानाच्या मालकासह एका कर्मचाऱ्याने किस्मत ज्योतीराम भोसले या पारधी समाजातील युवकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप करत दलित महासंघाने संबंधितांवर ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण, रघुनाथ सकट, रमाकांत साठे, सतीश शिंदे, महेश वायदंडे, विमल शिंदे, संदीप माने, नितीन भोसले, मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते. याबाबत दलित महासंघाने पोलीस उपअधीक्षक नवले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, किस्मत भोसले हे दारू खरेदीसाठी दुकानात गेले असता त्यांनी पैसे दिल्यानंतरही विनाकारण मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत भोसले गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ते सध्या सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दुकान मालक व कर्मचाऱ्यांचा नोकरनामा तपासावा, तसेच दुकानावर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली आहे. हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्क अधीक्षक व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना देण्यात आले.
दारूची दुकाने स्थलांतरित करा
राधिका रोडवरील दोन वाईन शॉप, एक परमिट रूम व एक देशी दारूचे दुकान यांमुळे महिला, विद्यार्थी व नागरिकांना त्रास होतो. ही दुकाने स्थलांतरित किंवा कायमस्वरूपी बंद करण्यात यावीत, असेही महासंघाने स्पष्ट केले आहे. दारू दुकानदारांच्या बाहेर मद्यधुंद व्यक्तींमुळे नागरिक, महिला, लहान मुले व वृद्ध यांना लुटमारी व छेडछाडीचा त्रास सहन करावा लागतो. जर संबंधितांवर कठोर कारवाई झाली नाही, तर दलित महासंघ तीव्र आंदोलन छेडेल," असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.