लग्नाच्या बहाण्याने सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक

तीन महिलांसह पाच जणांना अटक; फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई

by Team Satara Today | published on : 30 January 2025


सातारा : लग्नाच्या बहाण्याने एकाची सुमारे पावणेतीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह पाच जणांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या गुन्ह्यातील फिर्यादी हे 44 वर्षाचे अविवाहित पुरुष असून व्यवसायाने शेतकरी असल्याने त्यांचे लग्न जमत नव्हते. लग्नासाठी प्रयत्न करीत असताना त्यांच्या ओळखीच्यांनी त्यांना छाया साठे रा. आळंदी, जि. पुणे या महिलेचा फोन नंबर देऊन त्या लग्न जुळवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी छाया साठे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर छाया साठे व तिची साथीदार जयश्री दत्तू शिंदे रा. चिखली, ता. हवेली, जि. पुणे यांनी फिर्यादीच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याच्या उद्देशाने दोन मुले व विवाहित असलेल्या दिपाली प्रभू जाणे रा. पाटणादेवी रोड, रोशन नगर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव या महिलेशी संगनमत करून तिचे फिर्यादीशी लग्न आळंदी येथे लावून दिले. त्या मोबदल्यात त्यांनी फिर्यादी कडून एकूण पावणेतीन लाख रुपये रोख स्वरूपात घेतले होते. हे करीत असताना छाया साठे व जयश्री दत्तू शिंदे यांनी त्यांची साथीदार दिपाली प्रभू जाणे हिला मुले व विवाहित असल्याचे फिर्यादीस लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी कळवून तेथून निघून येण्यास सांगितले होते. त्यानुसार दिपाली ही लग्नानंतर सहा दिवसांतच फिर्यादीस खरी हकीकत सांगून तेथून निघून गेली.

फिर्यादीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी जयश्री शिंदे व छाया साठे यांना पैसे मागितले. त्यावर त्या दोघींनी दुसरी मुलगी दाखवते, असे सांगून आणखी दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यास फिर्यादीने तयारी दर्शवल्यानंतर दि. 27 जानेवारी रोजी जयश्री शिंदे या शशिकला तुकाराम जाधव रा. चिखली, ता. मंगळरुपीर, जि. वाशिम यांना नवरी मुलगी म्हणून घेऊन फलटण येथील एसटी स्टँड वर आल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत गजानन नामदेव डाखोरे, सुमित्रा गजानन डाखोरे व गोकुळ ज्ञानदेव लोंढे तिघेही रा. तांदुळवाडी ता. जि. सोलापूर उपस्थित होते.

फलटण स्टँडवर फिर्यादी गेल्यानंतर वरील व्यक्ती या नवरी मुलीचे खोटे नातेवाईक बनून पुन्हा फसवणूक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी ही बाब फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना कळविल्यानंतर पोलिसांच्या पथकाने फलटण बस स्थानकात येऊन वरील आरोपींना ताब्यात घेऊन फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला. या गुन्ह्यात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे, दीपक पवार, पोलीस अंमलदार तुषार आडके, अमोल अडसूळ यांनी सहभाग घेतला.

 

सध्या ग्रामीण भागात स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण विषम असून पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे केवळ शेती करणाऱ्या व नोकरी नसणाऱ्या युवकांची लग्ने जमण्यास अलीकडील काळात अडचण निर्माण होत आहे. नेमक्या याच अडचणीचा गैरफायदा घेऊन लोकांची फसवणूक करून पैसे लुबाडण्याचा नवीन फंडा निघाला आहे. वरील घटनेतील आरोपींचे फोटो पाहून यांच्यापैकी कोणी लग्न लावून देण्याचे अमिष दाखवून कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवकावर कोयत्याने हल्ला करून फरार झालेले तीनही हल्लेखोर जेरबंद
पुढील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या

संबंधित बातम्या