रत्नागिरी : स्वराज्याच्या कुलमुखत्यार व छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांचे शृंगारपूर येथे भव्य स्फूर्ती स्थळ व्हावे, या मागणीसाठी सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेश शिर्के हे आक्रमक झाले आहेत. या मागणीसाठी 9 सप्टेंबर रोजी पासून त्यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आमरण उपोषण सुरू केले आहे. शृंगारपूरचे सरपंच विनोद पवार या आंदोलनात सहभागी झाले आहे.
याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना सादर झालेल्या निवेदनात नमूद आहे की, स्वराज्यासाठी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली अठरापगड जातीच्या लोकांनी आपल्या जिवाचे रान केले. त्यातील राजेशिर्के व ईतरही आणेक घराण्यांशी खुद्द शिवरायांची सोयरीक होती. यापैकीच एक राजेशिर्के घराण्याने आपले तन-मन धन अर्पण केले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर स्वराज्य संकटात असताना अत्यंत धीरोदात्तपणे या संकटाचा सामना केला. संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराजांचे रक्षण केले. तब्बल 29 वर्ष त्या मुघल बादशाह औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या. बंदीवासातही त्यांनी शाहू महाराजांवर उत्तम संस्कार केले आणि कर्तुत्वान राजा घडवला. मात्र येसूबाईंचे हे कर्तुत्व इतिहासाच्या पानांमध्ये झाकोळल्यासारखे झाले आहे.
या कर्तुत्ववान कुलमुखत्यार सम्राज्ञीचे समाधीस्थळ लोकस्मृतीतून नष्ट व्हावे, ही दुर्दैवाची बाब आहे. यासाठी स्वतः सातार्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के रत्नागिरीला रवाना झाले. त्यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांना निवेदन सादर केले. महाराणी येसूबाईंचे जन्मस्थान असणार्या शृंगारपूर येथे भव्य स्फूर्तीस्थळ उभे करण्यात यावे, अशी कळकळीची मागणी सुहास राजेशिर्के व शृंगारपूर येथील ग्रामस्थांची आहे. येसूबाईच्या त्यागमय व धीरोदात्त कर्तृत्वाचे स्मरण व प्रेरणा आजच्या पिढीला मिळावी, हा या स्फूर्तीस्थानामागील मूळ उद्देश आहे. याकरिता सुहास राजेशिर्के व शृंगारपूर ग्रामस्थ यांनी लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या लढ्याला राज्य शासनाने स्फूर्तीस्थळाला मंजूरी देउन न्याय द्यावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.
सातारच्या माजी उपनगराध्यक्षांचे रत्नागिरीत बेमुदत उपोषण
महाराणी येसूबाई स्फूर्तीस्थळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या
by Team Satara Today | published on : 09 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा