दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कुली’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दरम्यान, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री चित्रपटाच्या प्रदर्शनाला उपस्थित राहिले आणि त्यांनी चित्रपटाबद्दल त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी चित्रपटाच्या यशाबद्दल रजनीकांत आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. त्यांना हा चित्रपट कसा आवडला हे देखील त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांचे कौतुक देखील केले आहे.
रजनीकांतच्या चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला उपस्थित राहिलेले तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि माजी अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी मनोरंजक असल्याचे म्हटले. ते म्हणाले की हा चित्रपट थलैवाच्या कारकिर्दीच्या ५० वर्षांचा उत्सव आहे. तसेच या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना सुपरस्टार रजनीकांत ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे, आणि प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘कुली’ हा एक गँगस्टर ड्रामा आहे, जो प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला आहे. रजनीकांत आणि लोकेश कनागराज पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात सत्यराज, नागार्जुन, आमिर खान, उपेंद्र, श्रुती हासन आणि सौबिन शाहीर यांसारखे प्रसिद्ध कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सगळ्यांची एकत्र केमिस्ट्री पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मज्जा येणार आहे.
दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत, त्यांचा हा चित्रपट खूप खास मानला जात आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर रजनीकांत यांचे या महान कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि म्हटले की, ‘कुली’ त्यांचा वारसा नवीन उंचीवर घेऊन जाईल.’ असे म्हणून त्यांनी पोस्ट देखील शेअर केली आहे.
‘कुली’ बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरच्या ‘वॉर २’ शी स्पर्धा करणार आहे. असे असूनही, चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ७५ कोटींचा आकडा ओलांडले आहे, जे त्याच्या प्रचंड लोकप्रियतेचे संकेत आहे. असा विश्वास आहे की या चित्रपटाला पहिल्याच दिवशी ब्लॉकबस्टर ओपनिंग मिळेल. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.