सातारा : शहरातील सदरबझार परिसरातील लक्ष्मी टेकडी येथे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांसह महिलांनी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढल्याची घटना समोर आली आहे. रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सर्वांनी एकत्र येत पोलीस ठाणे गाठले आणि परिसरातील कथित गैरप्रकार, त्रास तसेच सुरक्षेच्या प्रश्नाबाबत पोलिसांकडे आपली कैफियत मांडली. महिलांनी केलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लक्ष्मी टेकडी परिसरात रात्रीच्या वेळी महिलांना आणि नागरिकांना सुरक्षितपणे वावरता येत नसल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. काही व्यक्तींकडून महिलांना त्रास दिला जात असल्याचे तसेच परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे आरोप करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे नागरिकांना अखेर थेट पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावावा लागल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे रात्रीची वेळ असूनही महिलांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यावर धाव घेतल्याने या प्रकाराचे गांभीर्य अधोरेखित झाले. महिलांनी पोलिसांसमोर आपल्या समस्या मांडताना परिसरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
सदरबझार परिसरात यापूर्वीही रात्रीच्या वेळी तरुणांचे टोळके, नशेखोरी आणि हुल्लडबाजीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. नागरिकांना रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणेही अवघड होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे लक्ष्मी टेकडी परिसरातील महिलांच्या तक्रारींमुळे पुन्हा एकदा सदरबझारमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
दरम्यान, केवळ तक्रारींची नोंद करून न थांबता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, रात्रीची गस्त वाढविणे आणि तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. लक्ष्मी टेकडी परिसरातील काही व्यक्तींवर यापूर्वी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याच्या नोंदीही आहेत. यामुळे महिलांनी केलेल्या तक्रारींची पार्श्वभूमी तपासून पोलिसांनी परिस्थितीचा सखोल आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
सदरबझारच्या लक्ष्मी टेकडीवर नक्की कोणाची दहशत? भयभीत नागरिकांचा शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा; परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा