सातार्‍यात रक्षाबंधनाचा सण पारंपारिक उत्साहाने साजरा

by Team Satara Today | published on : 19 August 2024


सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये भावा- बहिणीच्या अतूट नात्याचा न संपणारा गोडवा रक्षाबंधनाच्या निमित्ताने पाहायला मिळाला. सातार्‍यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून बहिणींनी भावांना राख्या बांधून पारंपारिक पद्धतीने सण उत्साहात साजरा केला. सातारा कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या राख्या या विशेष चर्चेत राहिल्या.
रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीचे नाते जपणारा मोठा सण आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून सर्वत्र बहीण-भावाच्या प्रेमाचा आविष्कार पाहायला मिळत आहे. लाभार्थी सन्मान योजना मेळाव्यामध्ये सातारा जिल्ह्यातील हजारो भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी बाजारपेठेमध्ये अनोखा उत्साह पहायला मिळाला. भद्रा अमावस्यामुळे दुपारी दीड ते रात्री नऊ वाजेपर्यंत घरोघरी बहीण-भावाच्या प्रेमाचा उस्फूर्त अविष्कार रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिसून आला. बहिणींनी भावांच्या हातांवर नाजूक राख्या बांधत बहिणींचे रक्षण करावे, अशी साद घातली. बाजारपेठेमध्ये दीडशे रुपये पासून ते 1000 रुपये पर्यंतच्या वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या राख्या उपलब्ध होत्या.
सातारा जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार अशा शासकीय पातळीवर सुद्धा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या पुढाकाराने देगाव येथील माहेर या सामाजिक संस्थेमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. तांबे यांच्यासह तालुका पोलीस स्टेशन मधील 24 पोलीस कर्मचार्‍यांना येथील भगिनींनी राख्या बांधत संरक्षणाची मागणी केली. रक्षाबंधनासाठी बहिणीला भेट वस्तू कोणती द्यावी, याकरता भावांनी सुद्धा बाजारपेठेतून मोठी खरेदी केली होती. चॉकलेट पॅकेट, साडी, तसेच वेगवेगळ्या कलाकुसरीचे दागिने यांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. 
सातारा जिल्हा कारागृहातील कैद्यांनी सुमारे साडेतीनशे हुन अधिक राख्या तयार केल्या होत्या. या राख्यांची विक्री खुल्या बाजारपेठेमध्ये करण्यात आली. या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये रक्षाबंधनाच्या सणासाठी सातारा आगारामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या विनाथांबा सेवांना प्रचंड गर्दी झाली होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्याला पावसाने झोडपले
पुढील बातमी
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून दोन चोरीचे गुन्हे उघड

संबंधित बातम्या