सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार - अभयसिंह जगताप, निवडणुकीत चमत्कार घडेल

by Team Satara Today | published on : 05 June 2026


सातारा : महाविकास आघाडीच्या वतीने मला उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांचाही उमेदवारी अर्ज होता. मात्र, पक्षाने माझा अर्ज कायम ठेवला असून आता ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढविणार आहे. ही निवडणूक लोकनियुक्त प्रतिनिधींच्या सन्मानासाठीची लढाई असून या निवडणुकीत चमत्‍कार घडेल, असा दावा शरद पवार गटाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केला आहे.

अभयसिंह जगताप म्‍हणाले, सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संख्याबळ मोठे आहे. माझी लढाई ही लोकनियुक्त लोकप्रतिनिधींच्या सन्मानाची लढाई आहे. सातारा जिल्हा परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची बहुमताची ताकद असतानाही शंभूराज देसाई यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यावेळी झालेली मारहाण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य विसरलेले नाहीत.

भाजप मित्रपक्षांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांना सन्मानाने वागणूक देत नाहीत. विरोधकांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जाते. आमच्या हातात सत्ता आहे, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात. ही मानसिकता बदलण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना सन्मान मिळवून देण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे," असे जगताप यांनी सांगितले. विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ अधिक असले तरी या निवडणुकीत चमत्कार घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेखर चरेगावकर यांचा जामीन फेटाळला; सरकारी वकिलांच्या परखड युक्तिवादानंतर कराड न्यायालयाचा निर्णय
पुढील बातमी
कोयना, कृष्‍णा नद्यांना सोडलेल्या पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठीच; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा

संबंधित बातम्या