सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र होते. रविवार दिनांक 3 रोजी त्यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. मात्र या जयंतीचा सातारा जिल्हा प्रशासनासह सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषदेच्या शाळा व्यवस्थापनांना विसर पडला आहे. कोणीही नाना पाटील यांची जयंती साजरी केली नाही. यासंदर्भात सातारा जिल्हा परिषदेने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे शहर संघटक प्रणव सावंत यांनी केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य. कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दादा भुसे व महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त यांना पाठविण्यात आले आहेत.
शिवसेना उबाठा गटाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म त्या काळाच्या सातारा जिल्ह्यातील बहेवाळवा या गावी झाला. 3 ऑगस्ट हा दिवस त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. सातारा जिल्हा हा क्रांतिकारक नाना पाटील यांच्या कार्यक्षेत्राचा जिल्हा आहे आणि कर्मभूमी सुद्धा. सातारा जिल्ह्यातील शासकीय कार्यालय तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या कोणत्या शाळेमध्ये त्यांची जयंती साजरी करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची सातारा जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून येत्या दहा दिवसात याबाबत कारवाई करावी. अन्यथा येत्या दहा दिवसात आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू आणि या आंदोलनातून कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न निर्माण होईल त्याला सातारा जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.