सातारा : सातारा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून एका चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमाला सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संकेत स्वरूप गुजर (वय २५, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. २१ मार्च २०२२ रोजी सातारा शहरात ही संतापजनक घटना घडली होती.
घटनेच्या दिवशी पहाटेच्या सुमारास फिरस्ती असलेल्या एका चार वर्षीय बालिकेला दुचाकीवरून आलेल्या संकेत गुजर याने उचलून नेले होते. त्याने या चिमुरडीला सोनगाव येथील एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केले. पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ही बालिका रक्तबंबाळ अवस्थेत आणि विव्हळताना आढळून आली. नागरिकांनी तत्काळ माहिती दिल्यानंतर सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा तालुका आणि शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपी संकेत गुजर याला अटक केली. तत्कालीन आयपीएस अधिकारी आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. ज्योती दिवाकर यांनी मांडलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) सानिका जोशी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलीस प्रशासनाच्या प्रॉसिक्युशन स्कॉडच्या महिला पोलीस कर्मचारी शीतल भोसले आणि तेजा तुपे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. या निकालामुळे पीडित बालिकेला अखेर न्याय मिळाला आहे.