सातारा : महादरे (ता. सातारा) येथील डोंगरामध्ये एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती सोमवारी रात्री नऊ वाजता शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला मिळाल्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह डोंगरातून खाली आणला. संबंधित तरुणाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. महादरे येथील डोंगरामध्ये एका तरुणाने गळफास घेतल्याचे काही नागरिकांनी सातारा तालुका पोलिसांना सांगितले. यानंतर शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला याची माहिती मिळाली. या जवानांनी रात्री अंधरातही शोधमोहीम राबवून संबंधित तरुणाचा मृतदेह डोंगरातून खाली आणला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. सातारा तालुका पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.