विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी एसटीची विशेष बससेवा; सवलतीच्या दरात बस उपलब्ध होणार - विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांची माहिती

by Team Satara Today | published on : 23 November 2026


सातारा : शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या सहलींचा हंगाम लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने विशेष बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी मागणीनुसार सवलतीच्या दरात जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती सातारा विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी माहितीपत्रकाद्वारे दिली.
यंदा नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या चार महिन्यांच्या कालावधीत सातारा विभागांतर्गत सातारा, कराड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा आणि वडूज आगारांतून विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी विशेष बससेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी परिस्थितीनुसार नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेसही मागणीनुसार उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक सहलींचे नियोजन करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या सहलींचे नियोजन करताना नजीकच्या एसटी आगाराशी किंवा बसस्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आगाऊ बस आरक्षण करून विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत असून, शाळा-महाविद्यालयांनी मोठ्या संख्येने या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या सहलींसाठी एसटी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा विभागाचे विभाग नियंत्रक यांनी केले आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कांदाटी खोऱ्यातील खरोशीत २०० एकरचा भूखंड घोटाळा; पर्यावरण कार्यकर्ते सुशांत मोरे यांचा नवा लँड बॉम्ब
पुढील बातमी
वाहनात दाटीवाटीने जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल, तरडगाव येथे आमंत्रण हॉटेलसमोर पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या