सातारा : जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना शिक्षा सुनावली आहे. ही घटना 25 जून 2018 रोजी सातारा तालुक्यातील माजगाव येथे घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, माजगाव येथील शेतजमिनीतील नांगरणीच्या वादातून अवघूत कृष्णा पोळ, कृष्णा महादेव पोळ व दत्तात्रय कृष्णा पोळ यांनी संगनमत करून फिर्यादी संदीप अशोक जाधव यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत संदीप जाधव हे ट्रॅक्टरच्या चाकाखाली अडकून गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने अवघूत कृष्णा पोळ, कृष्णा महादेव पोळ आणि दत्तात्रय कृष्णा पोळ यांना विविध कलमांखाली पाच वर्षे शिक्षा सुनावली असून त्यात सक्तमजुरी व दंडाचाही समावेश आहे. तसेच आणखी एका आरोपी मुकुंद कृष्णा पोळ यालाही संबंधित कलमान्वये दोन वर्षे शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात पोलिसांनी केलेला तपास, सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले. पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निकालामुळे जमिनीच्या वादातून कायदा हातात घेणार्यांना कठोर संदेश मिळाला असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.