सातारा : राहते घर नावावर करा, नाहीतर जमीन विकून चार लाख रुपये द्या, यासाठी वृध्दाला मुलगा व सुनेने अपमानास्पद वागणूक देण्याचा प्रकार सातारा शहराजवळील खेड येथे घडल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्जुन गणपत कदम (रा. खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, मुलगा भास्कर अर्जुन कदम आणि सुनीता भास्कर कदम (दोघेही रा. खेड) यांच्याविरोधात हा गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार दि. 9 डिसेंबर ते दि. 13 डिसेंबर 2024 या कालावधीत घडला. मुलगी व सुनेवर वृध्दाच्या तक्रारीवरुन ज्येष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण अधिनियमासह शिवीगाळ दमदाटीप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
वृध्द अर्जुन कदम यांना संशयित हे राहते घर नावावर करा, नाहीतर जमीन विकून चार लाख रुपये द्या म्हणत होते. यावर तक्रारदारांनी नकार दिला. त्यामुळे संशयितांकडून शौचालयास कुलूप लावणे, थंड पाण्याने आंघोळ करा, स्वत:ची कपडे धुवा असे म्हणत त्रास देणे सुरु केले. त्याचबरोबर जेवण देत नव्हते. कोठेही जा असे म्हणून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ करण्यात आली होती, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस नाईक मोरे तपास करत आहेत.