सातारा : उसाला कोयता लावण्यापूर्वी शेतकर्याला उत्पादन किती होईल, रिकव्हरी किती येईल, यासाठीचे तंत्रज्ञान यावे. यावरुन शेतकरी ठरवेल ऊस आता घालायचा की महिन्याने, असे सांगून माजी खासदार शेट्टी पुढे म्हणाले, सरकार शेतकर्यांवर सतत अन्याय करत आहे. सिंचनासाठी सौरउर्जा पंप देण्यात येत आहेत. या पंपाने आवश्यक तेवढा दाब मिळत नाही. नवीन वीज कनेक्शन बंद केलीत. पश्चिम महाराष्ट्र हा डोंगरात आहे. त्यामुळे नदी, विहिरीतून दूर पाणी नेता येत नाही. यासाठी शासनाने व्यापक धोरण राबवायला हवे. जाणिवपूर्वक शेतकर्यांना फसवलं जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष राजू शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, अलीकडील काळात ‘एआय’ तंत्रज्ञान आलं पाहिजे अशी वक्तव्ये होत आहेत. आमची भूमिका ही जगातील अत्युच्च तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे अशीच आहे. साखर कारखानदारांनी लालचीपणाने कारखान्यांची गाळप क्षमता वाढवली आहे. गेल्यावर्षी तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने तीन महिनेच चालले आहेत. आता कारखान्यांना उसाची गरज भासतेय. यासाठी एकरी 125 टन उत्पादन निघाले पाहिजे, अशी कारखानदारांची भूमिका आहे. एआय’ तंत्रज्ञान चांगले. पण, ते चोहोबाजुंनी असावे. राज्यात 200 कारखाने आहेत. या कारखान्यात ऑनलाईन वजनकाटे करा. त्यामुळे वजनाशी छेडछाड होणार नाही, अशी मागणी 8 वर्षांपासून करत आहोत. पण, याकडे दुर्लक्ष होत आहे. आताचे एआय’ तंत्रज्ञान हे कारखान्यातील काटामारी थांबविण्यासाठीही वापरायला हवे.
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, आमदारांची बाचाबाची आणि कार्यकर्त्यांच्या मारहाणीबद्दलही शेट्टी यांनी भाष्य केले. राज्यात सरकार आहे कुठे, हेच दिसत नाही. आम्ही निवडून दिलेले आमदार आणि कार्यकर्ते विधानभवनात मारहाण करतात. लोक त्यांना रस्त्यावर जोड्याने मारतील, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.