बेळगावात सरसेनापती तळबीडचे सुपुत्र हंबीरराव मोहिते यांचा अश्वारुढ पुतळा विराजमान! ‘मराठा लाईट इन्फन्ट्री'त पुतळ्याचे अनावरण

by Team Satara Today | published on : 07 November 2026


कराड : स्वराज्याचे सरसेनापती आणि कराड तालुक्यातील तळबीडचे सुपुत्र हंबीरराव मोहिते यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आता बेळगावातील ऐतिहासिक 'मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर'च्या हेडक्वार्टरमध्ये दिमाखात विराजमान झाला आहे. मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या १०८ व्या 'शरकत दिना'चे औचित्य साधून या पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
लष्करी थाटात आणि अत्यंत उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात, मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्ये यांच्या हस्ते या पुतळ्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले. यावेळी लष्करातील वरिष्ठ अधिकारी, जवान, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, वंशज जयाजी मोहिते, सतीश पाटील, प्रताप पाटील, पांडुरंग वेदपाठक, दीपक राजमाने आदी उपस्थित होते.
वंशजांकडून लष्कराला ऐतिहासिक भेट...
स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते यांनी हा देखणा अश्वारूढ पुतळा मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरला भेट दिला आहे. आपल्या पूर्वजांचा पराक्रम देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सदैव प्रेरित करत राहावा, या उदात्त भावनेने मोहिते परिवाराने ही भेट दिली असून, याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१९१८ च्या मेसोपोटेमियन मोहिमे दरम्यान ११४ मराठा सैनिकांनी दाखवलेले असाधारण शौर्य आणि दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या या पराक्रमामुळे रेजिमेंटला 'शरकत' युद्ध सन्मान प्राप्त झाला, जो आजही धैर्य, बलिदान आणि लष्करी उत्कृष्टतेचे प्रतीक मानला जातो. या स्मृतीदिनानिमित्त 'शरकत वॉर मेमोरियल' येथे पुष्पचक्र अर्पण करण्यात येते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिमतीला आता ९ नव्या गाड्या दाखल; कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार
पुढील बातमी
खंडाळा तालुका शेतकरी सहकारी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडी; जपच्या पाच जणांच्या अपिलाचा निर्णय राखून ठेवला

संबंधित बातम्या