साताऱ्यात २९ डिसेंबर रोजी रायगाव येथे विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन महासन्मान सोहळा- घनश्याम छाबडा यांची माहिती

by Team Satara Today | published on : 25 December 2025


सातारा : सातारा जिल्ह्याच्या पवित्र भूमीत भारतातील महान तपस्वी साधुसंतांचे आगमन होत असून यानिमित्ताने सोमवार, दिनांक २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन महासन्मान सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, ही माहिती आयोजक घनश्याम छाबडा यांनी सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

हे विश्वव्यापी संत संमेलन मुक्काम पोस्ट रायगाव, ता. जावळी, जिल्हा सातारा येथील सौ. देवीबाई नारायणदास छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आवारात होत असून सध्या कार्यक्रमाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून आनेवाडी नजीक सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

विश्वशांती व विश्वकल्याणाचा संदेश

विश्वशांती, विश्वकल्याण, आरोग्य मार्गदर्शन, पर्यावरण शुद्धी, वृक्षारोपण, अन्नसुरक्षा, जलसुरक्षा, कन्या बचाव तसेच देव–देश–धर्म यांचे अध्यात्मिक प्रचार व प्रसार या उद्देशाने हे संत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. समाजामध्ये बंधुभाव, समता व सद्भावना निर्माण व्हावी, या हेतूने सातारा जिल्ह्यात प्रथमच रायगावच्या भूमीत असे भव्य विश्वव्यापी संत संमेलन होत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या महासन्मान सोहळ्यासाठी जगद्गुरु शंकराचार्य, स्वामी कृष्णानंद गिरी महाराज, कुंभमेळा समितीचे परमपूज्य महंत राम नारायण दानजी महाराज यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर साधुसंत, महंत व धर्माचार्य उपस्थित राहणार आहेत. या वेळी भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील निसर्गरम्य रायगावच्या भूमीत देशातील नामवंत अध्यात्मिक गुरूंचे दर्शन घडणार असल्याने भाविक वर्गात मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर भारतातील काशीपासून ते पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण काशीपर्यंत अध्यात्मिक गुरू, शिष्य व भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यासाठी साताऱ्यात दाखल होत आहेत. या विश्वव्यापी संत, महंत, धर्माचार्य व धर्मगुरू यांच्या स्वागतासाठी परिसरात ठिकठिकाणी भाविकांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास परिसरात २ ते ३ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती ; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन; दुरुस्तीसाठी एक आठवड्याचा कालावधी लागणार
पुढील बातमी
मानवी वस्तीत बिबट्या आढळल्यास घाबरुन न जाता वन व वन्यजीव विभागाशी संपर्क साधावा - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या