होळीचा सण म्हटलं की नुसती धमाल, मस्ती असते. कारण या दिवशी एकेकाला टार्गेट करून मनसोक्तपणे रंगवलं जातं. रंगवून घेणाऱ्यालाही त्याबाबात काही आक्षेप नसतो. कारण शेवटी होळीचा सण आहे. वेगवेगळ्या रंगात आपण रंगलो नाही तर सणाची मजा काय...आता ऑर्गेनिक रंग किंवा कोरड्या रंगांचा ट्रेंड आलेला आहे. पण तरीही काही जण असे असतात जे आपल्याला हमखास पक्का रंग लावून रंगवून टाकतात. तो रंग मग निघता निघत नाही. म्हणूनच आता हे ३ उपाय चटकन पाहून घ्या . यामुळे तुमच्या अंगाला लागलेला रंग कितीही पक्का असला तरी तो लगेच निघून जाईल.
अंगाला लागलेला होळीचा रंग निघून जाण्यासाठी काय करावे?
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे रंग खेळायला जाण्याआधी अर्धा तास तुमच्या शरीराला भरपूर खोबरेल तेल लावून मालिश करा.
खोबरेल तेल न लावता घराच्या बाहेर अजिबात पडू नका. नेहमीपेक्षा थोडेसे जास्त खोबरेल तेल लावले तरी चालेल. केसांनाही आठवणीने लावा.
२. त्यानंतर तुमच्याकडे असणारं तुमचं नेहमीच मॉईश्चरायजर आणि सनस्क्रिन लोशन हे दोन्हीही समप्रमाणात घेऊन एकत्र करा.
त्यानंतर खोबरेल तेल लावलेल्या अंगावर या दोन्ही पदार्थांचे मिश्रण व्यवस्थित चाेळून लावा. यामुळे खोबरेल तेल, मॉईश्चरायजर आणि सनस्क्रिन लोशन असे ३ थर तुमच्या त्वचेवर तयार होतील आणि त्यामुळे कोणताही रंग थेट तुमच्या त्वचेपर्यंत जाऊ शकणार नाही.
३. रंग खेळण्यापूर्वी ही काळजी घेतल्यानंतर रंग धुण्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूया. यासाठी बेसन पीठ हा सगळ्यात चांगला उपाय आहे.
बेसन पिठामध्ये थोडंसं खोबरेल तेल टाका आणि संपूर्ण अंगाला लावून चोळा. त्यानंतर अंग धुवा आणि पुन्हा एकदा तांदळाचे पीठ, बेसन पीठ, दूध आणि लिंबाचा रस असं एकत्र करून त्वचेवर चोळा. व्यवस्थित अंग धुवून घ्या. अंगाला चिकटलेला होळीचा सगळा रंग जाईल.