मुद्द्याची लढाई मुद्द्याने लढा’; मी कोण आहे, यापेक्षा माझ्या प्रश्नांना तार्किक उत्तरे द्या - विद्यानंद बापट यांचे आव्हान

by Team Satara Today | published on : 06 September 2026


पुणे : 'मुद्द्याची लढाई मुद्द्याने लढा. मी कोण आहे, कुठून आलो, यापेक्षा मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तार्किक उत्तरे द्या,” असे आव्हान ध्वनीविरोधी चळवळीचे अभ्यासक विद्यानंद बापट यांनी शुक्रवारी विरोधकांना दिले. आपल्या विचारांचा प्रतिवाद करता येत नसल्यामुळे वैयक्तिक पार्श्वभूमी, धार्मिक भूमिका आणि भावना दुखावल्याचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. मतभेद असतील तर त्यावर चर्चा करावी; मात्र विचार मांडणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करणे पुण्याच्या वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेला शोभणारे नाही, असा टोला त्यांनी लगावला.
गणेशोत्सवातील कर्कश ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात सातत्याने आवाज उठविणाऱ्या बापट यांनी गुरुवारी (दि. ३) एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना संतोष चव्हाण या व्यक्तीने त्यांना मारहाण केली. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली. या हल्ल्यानंतर बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, उत्सव साजरा करण्यास माझा विरोध नाही. मात्र त्यामुळे नागरिकांवर ध्वनिप्रदूषण लादले जाऊ नये, अशी माझी भूमिका आहे. सर्व धर्मांच्या उत्सवांतील आवाजासाठी समान नियम असावेत आणि न्यायालयाने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादांचे पालन व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. मारहाण झाली तरी ध्वनिप्रदूषणाविरोधातील आपला लढा थांबणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बापट यांच्या काही वक्तव्यांमुळे भावना दुखावल्याचा आरोप करत काही गणेश मंडळांकडून पोलिसांकडे तक्रार देण्याची तयारी सुरू असल्याचे समोर आले आहे. या आरोपांवर उत्तर देताना, भावना दुखावल्याचा दावा करण्यापेक्षा आपल्या भूमिकेचे तर्क आणि पुराव्यांच्या आधारे खंडन करावे, असे बापट यांनी सांगितले. या प्रकरणामुळे पुण्यातील ध्वनिप्रदूषणासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक उत्सवांमधील नियमांचे पालन आणि मतभेद व्यक्त करण्याच्या लोकशाही पद्धतीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्जाचे व्याज वेळेवर न दिल्याने एका महिलेचा विवस्त्र करून छळ ; बेंगळूरमधील घटना, चार आरोपींना अटक
पुढील बातमी
तुमच्या मंत्र्यांना आवरा; मराठा आरक्षणावरील टीकेवरून खासदार सुप्रिया सुळे आक्रमक; मराठा-ओबीसी वादासाठी सरकारलाच जबाबदार धरले

संबंधित बातम्या