सातारा : माणसाला तणावमुक्त करण्याची ताकद संगीतामध्ये आहे. संगीत ऐकण्याचा किंवा गाणी गाण्याचा छंद जोपासल्यास, तणावमुक्त जीवन जगणे शक्य होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी व्यक्त केले.
येथील दीपलक्ष्मी नागरी पतसंस्थेतर्फे आयोजित आणि गोल्डन इरा म्युझिकल ग्रुप प्रस्तुत ‘मेरी आवाज ही पहचान है’ आहे, ही जुन्या हिंदी- मराठी गाण्यांची मैफिल दीपलक्ष्मी सभागृहात नुकतीच झाली. त्यावेळी ते बोलत होते.
फडके म्हणाले, संगीत ऐकणे किंवा कलाकार म्हणून संगीताची आराधना करणे महत्त्वाचे आहे. संगीत, नृत्य असे छंद जोपासणारे दीर्घायुषी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
शिरीष चिटणीस म्हणाले, दीपलक्ष्मी सभागृहात असे कार्यक्रम सादर करून, संगीतकलेला प्रोत्साहन दिले जाईल. कराओके कार्यक्रम देशभरात होत आहेत. लोक घरातून बाहेर पडून, या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. टीव्ही आणि मोबाइलपासून बाजूला होऊन, ते लोकांमध्ये येऊन संवाद साधत आहेत.
डॉ. सारिका देशपांडे म्हणाल्या, या मैफिलीमुळे विस्मरणात गेलेल्या गाण्यांना उजाळा मिळाला. केवळ दोन कलाकारांनी गाणी सादर करणे सोपे नसते; परंतु सौ. अपर्णा गायकवाड आणि प्रवीण जांभळे यांनी ते आव्हान लीलया पेलले. यावेळी सौ. गायकवाड आणि श्री. जांभळे यांनी काही एकल व द्वंद्व गाणी सादर केली.