भक्ती, शक्तीचे प्रतीक असलेल्या पवनपुत्र हनुमानाची जयंती उत्साहात साजरी

विविध हनुमान मंदिरात विविध सामाजिक उपक्रम संपन्न

by Team Satara Today | published on : 13 April 2025


सातारा : बजरंग बली की जय, जय श्रीराम, जय हनुमान.. चा जयघोष करत आज श्रीराम भक्तांनी श्रीरामाचा भक्त असणाऱ्या श्री बजरंगबली अर्थात पवनपुत्र हनुमान चा जन्मोत्सव सूर्योदयाच्या वेळेस मोठ्या उत्साहात गुलाल पुष्प उधळत साजरा केला.

दरवर्षी चैत्र पौर्णिमेला संपन्न होणाऱ्या सूर्योदय समयीच्या या जयंतीसाठी रामभक्तांनी गेले तीन दिवस विशेष मेहनत घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केलेले दिसून येत होते .सातारा शहरातील राजवाडा परिसरातील वीर हनुमान मंदिरात जयंती उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई तसेच हनुमानाला विशेष चांदीचे अलंकार घालून मंत्रोचारात पूजा व अभिषेक करण्यात आला.

सालाबाद प्रमाणे चैत्र महिन्यात पाडवा ते नवमी दरम्यान राम नवरात्र सादर झाल्यानंतर चैत्र पौर्णिमेला रामभक्त हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते.

आज शनिवारी सकाळी सूर्योदयाच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरात हा जन्मोत्सव.. बजरंग बली की जय जय श्रीराम  चे जय घोषात मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला. सातारा शहर परिसरात असणारे ऐतिहासिक आणि विविध पुरातन हनुमान मंदिरांमध्ये या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शक्ती आणि बलाची उपासना करणाऱ्या अनेक श्रीराम भक्तांनी हनुमानाची आराधना करत हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला .

सातारा शहरातील प्रतापगंज पेठ, करंजे नाका परिसर, पोवई नाका, जरंडेश्वर नाका, गेंडामाळ, विसावा नाका, मंगळवार पेठ येथील मंगल मारुती, शनिवार पेठ येथील शनी मारुती, न्यू इंग्लिश स्कूल चौकातील सोन्या मारुती, शहर पोलीस स्टेशन जवळील पंचमुखी हनुमान मंदिर तसेच बोगदा परिसरातील डोंगरावरील सन्मित्र मारुती यासह दंग्या मारुती, नटराज मंदिरातील दास मारुती, शनिवार पेठेतील विष्णू मंदिरा नजीकचा काळा मारुती येथे, अजिंक्यतारा किल्ल्यावरील रस्त्या नजीकचा काळ्या दगडानजीकचा मारुती तसेच अजिंक्यतारा किल्ल्यातील ऐतिहासिक मारुती मंदिरात विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

व्यंकटपुरा पेठेतील मारुती मंदिरात तीन दिवसीय कीर्तन महोत्सव ही संपन्न करण्यात आला .अनेक मंदिरात पहाटेपासून हनुमानाचे मूर्तीला पवमानचा अभिषेक घालून विशेष महापूजा करण्यात आली. सकाळी सूर्योदयाच्या मुहूर्तावर जन्मकाळ करून गुलाल फुलांची उधळण करून श्रीरामाचा जयजयकार करण्यात आला. तसेच सुंठवडा आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले .

सातारा शहरातील गोल मारुती मंदिरामध्ये दोन दिवसीय जन्मोत्सव कार्यक्रमांमध्ये शुक्रवारी सायंकाळी  मंत्र जागर करण्यात आला. त्यानंतर शनिवारी सकाळी गुणकली चक्रपाणि शिंदे यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन सादर झाले. मंगळवार पेठेतील श्री मंगल मारुती मंदिरातही शुक्रवारी सायंकाळी  मंत्रजागर केला तसेच शनिवारी सकाळी पहाटे पाच ते सात या वेळेत भास्करबुवा काणे  यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले. रात्रौ 8 वा श्री ची महाआरती होऊन फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी बघण्यासाठी मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.विविध मंदिरांमध्ये सामाजिक उपक्रम निमित्त अनेक युवक मंडळांनी रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते, तसेच सातारा शहर परिसरातील नटराज मंदिरातील दास मारुती मंदिरातही जन्मोत्सव साजरा करण्यात आला श्रीफळ रुपी बाल हनुमानला जोजऊन महिलांनी पाळणा गीते म्हटली.

 नटराज मंदिरातील या भव्य काळ्या पाषाणाच्या मूर्तीला चांदीचे अलंकार घालून सजविण्यात आले होते .सातारा तालुका नजीकच्या कोरेगाव परिसरातील जरंडेश्वर येथील स्वयंभू हनुमान मंदिरातही दोन दिवस हनुमान भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.  जरंडेश्वर या ऐतिहासिक डोंगरावर स्वयंभू हनुमानाची मूर्ती आहे.सातारा जिल्ह्यातील हजारो हनुमान भक्त मध्यरात्रीपासूनच जरंडेश्वर कडे कुच करत होते.पहाटे या ठिकाणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने हनुमान जन्मोत्सव हजारो हनुमान भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मंदिराचे पुजारी धनंजयगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजित आयोजन करण्यात आले होते.

सज्जनगड येथील हनुमान मंदिरातही भव्यजन्मोत्सव संपन्न करण्यात आला. सज्जनगडावरील पेठेतील मारुती मंदिरात जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कराड तालुक्यातील चाफळ येथील श्रीराम मंदिरातही हा हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. माण तालुक्यातील वावरहिरे येथील हनुमंत महाराजांच्या श्री राम मंदिरात व गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या संस्थानातही तसेच गावातील थोरले राम मंदिर आणि धाकटे राम मंदिरातही हनुमान जयंतीचा उत्साह विशेषपणे दिसून येत होता. फलटण येथील नाईक निंबाळकर यांच्या श्रीराम मंदिरातील हनुमान मंदिरातही हा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.

समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या अकरा मारुती पैकी मसूर ,उंब्रज, चाफळ  ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरातही हनुमान भक्तांनी दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती अनेक हनुमान मंदिर व सेवा मंडळाच्या वतीने भंडारा म्हणजेच महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा वॉरियर्सचा महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये दमदार प्रवेश
पुढील बातमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कृषिक्रांतीचे जनक

संबंधित बातम्या