सातारा : आरळे परिसरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या डीपीमधून सुमारे 150 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या तारेची अंदाजे किंमत 60 हजार रुपये असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय परबती पवार यांच्या शेतातील तसेच मौजे आरळे येथील चंद्रकांत चव्हाण यांच्या कॅनॉलशेजारील ऊसाच्या शेतातील आणि विठ्ठल प्रल्हाद कदम यांच्या ऊसाच्या शेतातील डीपीमधून तांब्याची तार चोरीस गेली.
अज्ञात चोरट्याने डीपीमधील प्रत्येकी अंदाजे 50 किलो, अशी एकूण 150 किलो तांब्याची तार चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या तारेची एकूण किंमत अंदाजे 60 हजार रुपये आहे.
ही घटना दि. 5 रोजी रात्री 11 वाजल्यापासून दि. 7 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत वायरमन प्रसाद सुनील जगदाळे (वय 26, रा. मु. पो. कोलवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.
आरळे परिसरातील तीन डीपींमधील 60 हजारांची तांब्याची तार चोरीला; अज्ञातांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा