राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरि मदत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by Team Satara Today | published on : 19 September 2026


मुंबई :  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिके खराब होत आहेत. अनेक ठिकाणी उतारा कमी येईल, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी यावर चर्चा करून आपापल्या जिल्ह्यांत मूल्यमापन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. साधारणपणे पुढील आठवड्यात आम्ही प्राथमिक आढावा घेऊ. त्यानंतर पंचनामे आम्ही करू आणि तातडीची मदतही आम्ही करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीचे काम सुरू आहे. याबाबत तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत. उर्वरित याद्या वेगाने पूर्ण कराव्यात, असे आदेश दिलेले आहेत. पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था असेल, शेतकऱ्यांना जी तातडीची मदत करणे गरजेचे आहे, ती सर्वतोपरि मदत सरकारच्या वतीने केली जाणार आहे.  यावेळी अल निनोचे संकट येणार असल्याचे माहिती असल्यामुळे चाऱ्याची लागवड करून ठेवलेली आहे. जिथे चाऱ्याची टंचाई जाणवेल, तिथे पुरवठा केला जाईल. सायंकाळी शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज मिळावी, याचीही तजवीज केलेली आहे. त्यामुळे सगळ्या भागात जास्त वीजही आपण देत आहोत. काही ठिकाणी सिंगल फेज असल्यामुळे वीज दिली जात नव्हती; पण, आता तिथेही वीज देण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
वेगवेगळ्या उपाययोजना आधीपासूनच सुरू केलेल्या आहेत
ज्या ठिकाणी विहिरीला पाणी आहे, त्या ठिकाणी पिके वाचवता येतील. वेगवेगळ्या उपाययोजना आधीपासूनच सुरू केलेल्या आहेत. दुष्काळी उपाययोजना करून काही ना काही दिलासा आपल्या शेतकऱ्यांना आपण देऊ, असा विश्वास मुख्मयंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, विरोधकांच्या काळातही तेच जीआर होते. जीआरप्रमाणे कधी काय करावे, याचेही नियम आहेत. त्या नियमांचे पालन केले, तरच एनडीआरएफचे पैसे मिळतात. एकीकडे आपण त्या नियमांचे पालन करत आहोत, दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीनेही न थांबता आपण मदत करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची विरोधकांना वाईट सवय
प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याची वाईट सवय विरोधकांना लागलेली आहे. शेतकरी अडचणीत असताना जरूर मदत करू, सगळे मिळून मदत करू. पण केवळ राजकारण करायचे, हे काही योग्य नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. केंद्राकडे मागणी करण्याची जी पद्धत आहेत, त्यात ५ ऑक्टोबरनंतरचे पंचनामे, या आधारावर प्रस्ताव द्यावा लागेल. तोपर्यंत आपण आपली प्रक्रिया करत आहोत. जेणेकरून, पंचनामे करून केंद्राला प्रस्ताव पाठवला जाईल. ज्या ठिकाणी पाणी आहे, त्या ठिकाणी रब्बीचे नियोजन आपण करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अचानक प्रकृती बिघडली; कोल्हापूर दोन दिवशीय दौरा रद्द, स्वागत फलक उतरवले

संबंधित बातम्या