फलटण : फलटण तालुक्यातील आसू गावामध्ये जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला असून, त्याच्यावर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशुद्ध पाणी पिण्याने हा आजार झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले असून, रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, आ. सचिन पाटील यांनी आसू गावाला भेट देऊन प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.
आसू येथील तेरा वर्षीय मुलाला जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या मुलावर सुरुवातीला गावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला अधिक त्रास सुरू झाल्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले. मुलाला जीबीएसचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग व प्रशासन खडबडून जागे झाले आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आ. सचिन पाटील यांनी आसू गावाला भेट देऊन गावातील सांडपाणी व्यवस्थापन, गटार, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतेची पाहणी केली.
दरम्यान, त्यांनी प्रशासनाला खबरदारीच्या सूचना केल्या. यावेळी पंचायत समितीचे प्रभारी गट विकासअधिकारी कुंभार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल दिघे, भाजपा तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, विशाल माने, अमोल लवळे, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आसू येथे जीबीएस रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने गावामध्ये घरोघरी जाऊन सर्वे केला आहे. पाण्याचे नमुने घेवून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच खबरदारीच्या सर्व उपाययोजनांची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे. घर परिसर स्वच्छ ठेवावा. वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. स्वच्छ आणि ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाऊ नये. मांसाहार करणार्यांनी अधिक काळजी घेऊन जास्त प्रमाणात मांसाहार शिजवून खावा. तालुक्यातील गावोगावच्या सर्व ग्रामस्थांनीही या सूचनांचे पालन करावे. कोणाला उलट्या, जुलाबचा त्रास अथवा कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. निखिल दिघे यांनी केले आहे.