महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणातील पोलीस निरीक्षक गोपाळ बदने पोलीस ठाण्यात शरण; प्रशांत बनकर याला अटक; चार दिवस पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 25 October 2025


सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणातील फलटण येथील पोलीस निरीक्षक गोपाळ बदने हा घटना घडल्यापासून फरार होता. रात्री उशिरा फलटण पोलीस ठाण्यात तो शरण आला आहे.  आज सकाळी महिला डॉक्टरला त्रास दिल्याप्रकरणी घरमालक प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, महिला डॉक्टरने प्रशांत बनकर याला प्रपोज केले होते असा धक्कादायक गौप्यस्फोट तिच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस निरीक्षक गोपाळ बदने व घरमालक प्रशांत बनकर याच्यावर आरोप करत सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर गोपाळ बदने याला निलंबित करण्यात आले होते. 

आत्महत्या घटनेनंतर गोपाळ बदने व प्रशांत बनकर हे फरार झाले होते. आज पहाटे पोलिसांनी बनकर याच्या मुसक्या आवळल्या होत्या. फरार गोपाळ बदने याचा शोध सुरू असतानाच त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे आढळले होते. त्याचा पंढरपूर परिसरात पोलीस शोध घेत असताना दि. २५ रोजी रात्री उशिरा गोपाळ बदने पोलीस ठाण्यात शरण आला आहे.  

दरम्यान अत्याचार व आत्महत्या प्रकरणाची सलग दुसऱ्या दिवशी राज्यभरात पडसाद उमटत असून आज शनिवारी आ. धनंजय मुंडे, सुरेश धस यांनी या अत्याचार प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बनकर याच्या बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट 

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि त्यानंतर तिने केलेली आत्महत्याची घटना राज्यपातळीवर गांभीर्याने घेतली असतानाच दरम्यान, महिला डॉक्टरने प्रशांत बनकर याला प्रपोज केले होते असा धक्कादायक गौप्यस्फोट तिच्या बहिणीने माध्यमांशी बोलताना केल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शुक्रवारपासून या प्रकरणात नवनवीन खुलासे पुढे येत असून आज शनिवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना प्रशांत बनकर याच्या बहिणीने सांगितले की, मी घरी आले की डॉक्टरला भेटायचे. ती आमच्याकडे रहायला होती. आमची एवढी मैत्री झाली होती की, ती सर्व मला सांगायची. मी नोकरी करायचे. मी तिला म्हणायचे की तुला चांगला सरकारी जॉब आहे. त्यावर ती म्हणाली की, आमच्या नोकरीत खूप तणाव आहे. ती खूप तणावातच असायची. या महिन्यात प्रशांत आठ दिवसांसाठी घरी आला होता. तो तिच्याशी घरातल्यांसारखेच बोलायचा.

तो पुण्याला आला तेव्हा तिने त्याला मेसेजवर प्रपोज केले होते. त्यावर भावाने नाही मॅडम, मी तुम्हाला घरातलेसारखे मानतो, तुम्ही मला दादा म्हणता असे म्हणत नकार दिला होता, असा गौप्यस्फोट प्रशांत बनकर याच्या बहिणीने केला आहे. तो जर त्यांचा मानसिक छळ करत होता तर लक्ष्मीपूजनवेळी त्यांचे आई-वडील आलेले तेव्हा का नाही सांगितले. माझ्या भावाने तिला नाही म्हटले म्हणून तिने नाव घेतले आहे. त्यांनी तिला आधीच स्पष्ट केले होते व संपर्कात नव्हता असा दावा प्रशांत बनकर याच्या बहिणीने केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा हादरला ; डॉक्टर महिलेने संपवले आपले जीवन
पुढील बातमी
मोळाचा ओढा येथील रिक्षास्टॉपवर रिक्षा लावण्याच्या कारणावरुन मारहाण; परस्परविरोधी तक्रारी

संबंधित बातम्या