सातारा : ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर इंडिगो कंपनीच्या विमानसेवेचा बोजवारा उडाल्याने त्याचा फटका केवळ मंत्री, आमदार यांनाच नव्हे तर विविध पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यांनाही बसला असून त्यामुळे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला जाण्यासाठी त्यांच्यावर पर्याय शोधण्याची वेळ आली. कार, बस आणि रेल्वेचा प्रवास करून अखेर त्यांनी नागपूर गाठले.
राज्याचे हिवाळी अधिवेशन आज सोमवारपासून सुरू झाले असून पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश आमदार मुंबई अथवा पुण्यातून नागपूरला विमानाने जातात. त्यामुळे हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला जाणारी विमाने फुल्ल असतात. अशा परिस्थितीत इंडिगो विमान सेवेचा बोजवारा उडाल्यामुळे आमदारांसह मंत्र्यांना नागपूर जाण्यासाठी पर्याय शोधावा लागला.
सातारा जिल्ह्यातून हिवाळी अधिवेशनाला जाण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. विविध पक्षांचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावत असतात. जिल्ह्यातील विविध प्रश्न आमदार, मंत्री यांच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये मांडले जात असतात मात्र ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर इंडिगो विमान सेवेचा बोजवारा उडाल्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कार, बस आणि रेल्वेचा पर्याय निवडावा लागला. पश्चिम महाराष्ट्रातून प्रतिदिन एकच कोल्हापूर- गोंदिया ही रेल्वे सेवा असल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून या रेल्वेला मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.
जिल्ह्यातील अनेकांची गैरसोय
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे तिन्ही जिल्हे आर्थिक दृष्ट्या सधन मानले जातात. पश्चिम महाराष्ट्रातून विविध कामानिमित्त मुंबई, दिल्ली, गुजरात, बेंगलोर येथे जाणाऱ्या व्यवसायिकांची संख्या हजारोंच्या प्रमाणात आहे. हल्ली विमानाने प्रवास करणे हे सामान्य नागरिकांना फार अवघड गोष्ट राहिली नाही. त्यामुळे वेळेची बचत होण्यासाठी बहुतांशीजन विमान प्रवासालाच पसंती देतात. गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमानसेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे जिल्ह्यातील अनेक व्यवसायिकांची गैरसोय झाल्याचे दिसून येत आहे.