जि. प. सदस्य बापू शिंदे यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या अनिल देसाई व संदीप मांडवे यांना जामीन मंजूर

by Team Satara Today | published on : 24 March 2026


सातारा : जिल्हा परिषद सदस्य दिनकर उर्फ बापू शिंदे यांच्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले जिल्हापरिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे यांची आज न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.

जिल्हापरिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये साताऱ्यात मोठा राडा झाला. निवडणुकीच्या आदल्या रात्री जिल्हापरिषद सदस्य बापू शिंदे यांचा मुलगा विकास शिंदे याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यामध्ये वडीलांचे अपहरण करण्यात आले असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. तसेच त्यामध्ये अनिल देसाई व संदीप मांडवे यांच्यासह काही जणांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. ही गोष्ट समजल्यानंतर बापू शिंदे यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात व वाई उपअधीक्षक कार्यालयात जाऊन अपहरण झाले नसल्याचे सांगितले होते.

दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सर्व सदस्य वाहनातून एकत्रित जिल्हापरिषदेत आले. या वेळी जिल्हापरिषद इमारतीमध्ये अगोदरच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी संदीप मांडवे व अनिल देसाई यांना पकडले. या वेळी पोलिसांनी धक्का-बुक्की केल्याचा आरोप पालकमंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांनी केला आहे. त्यावरून काल विधानसभा व विधानपरिषदेत गोंधळही झाला. त्यातून याप्रकरणाची चौकशी लावण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दोघांना महाबळेश्वर पोलिस ठाण्यात नेले होते. तेथे अटकपूर्व वैद्यकीय तपासणीत प्रकृती बिघडल्याचे समोर आल्याने दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
८ दिवसांची मुदत; कोरेगाव–तडवळे मार्गाचे काम सुरू न झाल्यास आझाद चौकात रास्ता रोको - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

संबंधित बातम्या